बस बांधणीची प्रकिया थांबली
By Admin | Updated: September 4, 2014 00:51 IST2014-09-04T00:23:29+5:302014-09-04T00:51:42+5:30
औरंगाबाद : राज्य परिवहन महामंडळाच्या चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत गेल्या काही महिन्यांपासून ‘चेसिस’चा पुरवठा न झाल्याने नवीन बसची निर्मिती बंद आहे.

बस बांधणीची प्रकिया थांबली
औरंगाबाद : राज्य परिवहन महामंडळाच्या चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत गेल्या काही महिन्यांपासून ‘चेसिस’चा पुरवठा न झाल्याने नवीन बसची निर्मिती बंद आहे. आॅगस्टपासून नवीन बसची निर्मिती सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती; परंतु अद्यापही चेसिसचा पुरवठा झालेला नाही, त्यामुळे नवीन बस बांधणीसाठी ‘चेसिस’ची प्रतीक्षा करावी लागत आहे.
राज्य परिवहन मंडळाच्या वतीने दापोली, नागपूर आणि औरंगाबादेतील चिकलठाणा येथील कार्यशाळेत नवीन बसची निर्मिती केली जाते. येथे तयार झालेल्या नव्या बसेस राज्यभरात पाठविण्यात येतात; परंतु चेसिसचा पुरवठा बंद राहिल्याने चिकलठाणा कार्यशाळेत गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून नव्या बसची बांधणी बंद आहे. येथे सध्या जुन्या बसेसच्या पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. नवीन बसची बांधणी बंद राहिल्यामुळे यावर्षी उन्हाळी हंगामात आणि आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरसाठी देण्यात येणाऱ्या नवीन बस देण्यातही खंड पडला. १२० चेसिसचा पुरवठा होणार असल्याने आॅगस्टपासून नवीन बसची निर्मिती सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती; परंतु प्रत्यक्षात सप्टेंबर महिना सुरू होऊनही चेसिसचा पुरवठा झालेला नसल्याने कार्यशाळेत नवीन बसची बांधणी थांबलेली आहे. सध्या कार्यशाळेत कर्मचाऱ्यांना शुल्लक कामे करावी लागत आहेत.
लवकरच पुरवठा
कंपनीत चेसिस आलेल्या आहेत; परंतु कार्यशाळेत चेसिस अद्यापर्यंत आलेल्या नाहीत; परंतु आगामी एक-दोन दिवसांमध्ये चेसिसचा पुरवठा होईल, अशी माहिती चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेचे व्यवस्थापक जयवंत चव्हाण यांनी दिली.
महिन्याला होतेय ८० बसेसची पुनर्बांधणी
चिकलठाणा कार्यशाळेत सध्या दररोज जवळपास ३ ते ४ जुन्या बसेसची पुनर्बांधणी केली जात आहे. महिन्याला जवळपास ८० ते १०० बसेसची पुनर्बांधणी या ठिकाणी होत आहे. शिवाय याठिकाणी महिन्याला जवळपास ७५ नवीन बसची निर्मिती केली जाते; परंतु गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून ही निर्मिती झाली नाही.