देशभर बसची बांधणी एकसमान

By Admin | Updated: July 17, 2014 01:35 IST2014-07-17T01:23:03+5:302014-07-17T01:35:49+5:30

औरंगाबाद : केंद्र शासनाने लागू केलेल्या ‘एआयएस-५२’ (आॅटोमोबाईल इंडियन स्टँडर्ड ५२) या नियमानुसार खासगी आणि शासकीय बसची बांधणी केली जाणार आहे.

Bus building works uniform across the country | देशभर बसची बांधणी एकसमान

देशभर बसची बांधणी एकसमान

औरंगाबाद : केंद्र शासनाने लागू केलेल्या ‘एआयएस-५२’ (आॅटोमोबाईल इंडियन स्टँडर्ड ५२) या नियमानुसार खासगी आणि शासकीय बसची बांधणी केली जाणार आहे. त्यामुळे देशभरातील सर्व बसची बांधणी एकसारखी असेल. खासगी बसनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांना हे नियम १ एप्रिलपासून लागू झाले आहेत, तर एसटी महामंडळ १ एप्रिल २०१५ पासून या नियमानुसार बसची बांधणी करणार आहे.
राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे १४ जुलै रोजी येथे आले होते. एप्रिल २०१५ पासून ‘एआयएस ५२’ या नियमानुसार एसटी महामंडळ बसची बांधणी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्र शासनाने बसची निर्मिती करणाऱ्यांना बस बांधणीची ही नियमावली लागू केली आहे. त्यामुळे एसटी महामंडळालाही या नियमानुसार बसची निर्मिती करावी लागणार आहे. एसटी महामंडळाच्या बस दापोली, नागपूर आणि औरंगाबाद येथील कार्यशाळेत तयार केल्या जातात. पुणे येथील संस्थेकडून एक बस तयार करून घेण्यात येणार आहे. त्यानुसार एसटी कार्यशाळेत नव्या आर्थिक वर्षात नव्या नियमानुसार बसची बांधणी केली जाईल, अशी माहिती चिकलठाणा कार्यशाळेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
नविन नियमानुसार बसची निर्मिती होणार असल्याने आगामी काळात बसचा प्रवास सुखकर व सुरक्षित असणार आहे.
दोन सीटमधील अंतर सारखे
सध्या बसच्या बांधणीत बसनिहाय लांबी, रुंदी, दारे, खिडक्या, सीटची लांबी, दोन सीटमधील अंतर यात फरक दिसतो; परंतु आता सगळ्या बसची बांधणी एआयएस ५२ नियमांनुसार करावी लागेल. त्यामुळे सीटची लांबी, दोन सीटमधील अंतर, बसची लांबी, रुंदी आदी एकसारखे राहील, असे महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले.
ठराव संमत करण्यात आला
राज्य परिवहन मंडळ ‘एआयएस-५२’ची अंमलबजावाणी आगामी एप्रिल २०१५ पासून केली जाणार आहे. याबाबत ठराव संमत करण्यात आला आहे. -जीवनराव गोरे,
अध्यक्ष, राज्य परिवहन महामंडळ
रंगसंगतीत फरक
नॉन डिलक्स, डिलक्स आणि एसी डिलक्स, असे बसचे प्रकार आहेत. यामध्ये एसटी महामंडळाच्या नॉन डिलक्समध्ये लाल बसगाड्या, डिलक्समध्ये सेमी लक्झरी, तर एसी डिलक्समध्ये व्हॉल्वोच्या बस आहेत. या सर्व बस आगामी काळात सारख्याच आकाराच्या दिसतील. केवळ रंगसंगतीमध्ये बदल असेल.
पासिंग नवीन नियमांनुसार
खासगी बसनिर्मितीलाही हा नियम लागू झाला आहे; परंतु महामंडळाच्या या नियमांनुसार बस बांधणीसाठी वर्षभराची मुदत मिळाली आहे. एआयएस-५२ नियमांप्रमाणे आगामी काळात बसगाड्यांची पासिंग होणार आहे.

Web Title: Bus building works uniform across the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.