छत्रपती संभाजीनगर :एसटी महामंडळाचे चालक वाहतुकीचे नियम पाळत असले तरी काही वेळा गाफील असणे महागात पडते. एसटी चालकाने सिग्नल तोडला, वेगमर्यादेचे उल्लंघन केले किंवा चुकीच्या मार्गावर गाडी चालवली, तर हा दंड थेट त्याच्या खिशातून वसूल केला जातो.
वाहतुकीच्या नियमांबाबत एसटी चालकांना नियमित प्रशिक्षण दिले जाते. मात्र तरीही काही वेळा ताण, वेळेचा दबाव वा दुर्लक्षामुळे वाहतूक नियमाचा भंग होतो. त्यामुळे महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून चालकांना नियमांचे पालन करण्याची सूचना केली जाते. वाहतूक नियम पाळला नाही तर दंड भरावा लागणार, तोही स्वत:च्या खिशातून, असेही सांगितले जाते.
एसटी चालकाने वाहतुकीचा नियम तोडला तर...एसटी चालकाने वाहतुकीचा नियम तोडल्यास संबंधित बसच्या क्रमांकासह दंडाची पावती एसटी महामंडळाला मिळते. बसच्या क्रमांकावरून संबंधित दिवशी कर्तव्यावर असलेल्या चालकाकडून सदर दंड वसूल करण्यात येतो.
८० कि.मी.चा वेग ‘लाॅक’एसटी महामंडळाच्या बसेस प्रतितास ८० कि.मी. वेगापेक्षा अधिक गतीने धावत नाहीत. त्यामुळे अतिवेगाने बस चालविण्याप्रकरणी दंड होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
दरवर्षी हजारोंचा दंडएसटी विभागाने स्पष्ट धोरण आखले आहे. वाहतुकीचा नियम तोडल्यास जबाबदारी चालकाची. त्यामुळे दंडाची रक्कम महामंडळाने न भरता ती चालकाकडून वसूल केली जाते. चालकांना दरवर्षी हजारो रुपयांच्या दंडाला सामोरे जावे लागते.
लेनची शिस्त मोडल्याचा सर्वाधिक दंडसिग्नल तोडणे, अतिवेगाने बस चालविणे, असे प्रकार एसटी चालकांकडून होत नाहीत. मात्र, लेनची शिस्त पाळली नसल्यावरून दंड होण्याचे प्रमाण अधिक आहे. पुणे मार्गावरील बसला हा दंड प्राधान्याने होतो. चालकांना वेळाेवेळी वाहतुकीचे नियम पाळण्यासंदर्भात सूचना केल्या जातात.- संतोष घाणे, विभागीय वाहतूक अधिकारी