८०० टायर भस्मसात
By Admin | Updated: April 3, 2017 22:39 IST2017-04-03T22:38:38+5:302017-04-03T22:39:26+5:30
उस्मानाबाद : राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यशाळा परिसरातील गोडाऊनमध्ये ठेवण्यात आलेल्या जुन्या टायरांना सोमवारी आग लागली़

८०० टायर भस्मसात
उस्मानाबाद : राज्य परिवहन महामंडळाच्या उस्मानाबाद शहरातील विभागीय कार्यशाळा परिसरातील गोडाऊनमध्ये ठेवण्यात आलेल्या जुन्या टायरांना सोमवारी सकाळी अचानक आग लागली़ या आगीत ८०० जुने टायर खाक झाले असून, इतर साहित्यासह जवळपास २ लाख ४३ हजार रूपयांचे साहित्य जळून खाक झाले़ टायरला लागलेली आग अटोक्यात आणण्यासाठी चार अग्निशमन दलाच्या वाहनांना पाचरण करण्यात आले होते़
शहरातील जुना बसडेपो भागातील राज्य परिवहन महामंडळाची विभागीय कार्यशाळा परिसर आहे़ या परिसरात बसेसची जुनी टायरे ठेवण्यात आली होती़ या भागातील जुन्या टायरांना सोमवारी सकाळी अचानक आग लागली़ पाहता पाहता या आगीने रौद्र रूप धारण केले़ लागलेली भीषण आग विझविण्यासाठी उस्मानाबाद, तुळजापूरसह लातूर येथील अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचरण करण्यात आले़ तसेच एस़टी़महामंडळाच्या टँकरद्वारेही पाणी नेऊन मारण्यात आले़ परिसरातील नागरिकांनीही आग अटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर विभाग नियंत्रक राजीव साळवी, यंत्र अभियंता पाटील, वाहतूक नियंत्रक गोंजारी, कामगार अधिकारी घाडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रियंका नारनवरे यांच्यासह एसटी महामंडळ व पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली होती़ ही आग सकाळी ११़३० वाजण्याच्या सुमारास अटोक्यात आली़ आग अटोक्यात आल्यानंतर जेसीबीने जळालेले टायर बाजुला करण्यात आले़ या आगीत जवळपास ८०० जुने टायर जळून खाक झाले़ दरम्यान, काही महिन्यांपूर्वी येथील जुन्या टायरांची लिलावाद्वारे विक्री झाली होती़ त्यामुळे मोठा अनर्थ टळला़ दरम्यान, ही आग नेमकी कोणत्या कारणाने लागली ? हे रात्री उशिरापर्यंत समोर आले नव्हते़ या प्रकरणी शहर ठाण्यात जळीतची नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)