पेटलेले सिलिंडर रस्त्यावर
By Admin | Updated: September 21, 2014 00:14 IST2014-09-21T00:14:06+5:302014-09-21T00:14:06+5:30
औरंगाबाद : मकाईगेटलगत एका जणाने चक्कपेट घेतलेले गॅस सिलिंडर रस्त्यावरच फेकले. वेळीच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी सिलिंडरची आग विझविली.

पेटलेले सिलिंडर रस्त्यावर
औरंगाबाद : मकाईगेटलगत एका जणाने चक्कपेट घेतलेले गॅस सिलिंडर रस्त्यावरच फेकले. वेळीच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी सिलिंडरची आग विझविली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सिलिंडरचा स्फोट झाला असता तर मोठी जीवित हानी झाली असती. घरगुती वापराच्या सिलिंडरमधील गॅस अनधिकृतरीत्या वाहनांमध्ये इंधन म्हणून वापरण्यासाठी भरून देताना हा प्रकार घडल्याचे सूत्रांनी सांगितले.
घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, मकाईगेटच्या बाजूलाच एका ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून राजरोसपणे घरगुती सिलिंडरमधील गॅस धोकादायक पद्धतीने वाहनांमध्ये इंधन म्हणून भरून देण्याचा ‘उद्योग’ सुरू होता. विद्युत मोटारीच्या साह्याने गॅस रिफिलिंगची ही पद्धत अत्यंत धोकादायक मानली जाते.
याठिकाणी आज दुपारी एका व्हॅनमध्ये गॅस भरण्याचे काम सुरू होते. त्यावेळी अचानक स्पार्किंग होऊन सिलिंडरला आग लागली. तेव्हा हा उद्योग करणाऱ्या व्यक्तीने चक्क ते पेटते सिलिंडर रस्त्यावर फेकले.
हा रस्ता अत्यंत वर्दळीचा आहे. पेटते सिलिंडर पाहून रस्त्याने येणाऱ्या- जाणाऱ्या वाहनचालकांची पाचावर धारण बसली. दोन्हीकडची वाहतूक जागीच थांबली.
घटनेची माहिती अग्निशामक दलाला तात्काळ कळविण्यात आली. अग्निशामक दल येईपर्यंत तेथील नागरिकच नळीने पाणी मारून सिलिंडरची आग विझविण्याचा प्रयत्न करीत होते.
शिवाय अनेक नागरिक तेथे बघे म्हणून उभे होते. त्यावेळी जर या सिलिंडरचा स्फोट झाला असता तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला असता. सुदैवाने सिलिंडर फुटले नाही. मग अग्निशामक दलाने जवान तेथे पोहोचले आणि त्यांनी ही आग विझविली. विशेष म्हणजे या प्रकरणी पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.