भर दिवसा घरफोडी; सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2017 00:26 IST2017-02-08T00:21:18+5:302017-02-08T00:26:37+5:30
राजूर : येथील एका व्यापाऱ्याचे चोरट्यांनी घर फोडून सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना मंगळवारी भर दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली

भर दिवसा घरफोडी; सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास
राजूर : येथील एका व्यापाऱ्याचे चोरट्यांनी घर फोडून सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना मंगळवारी भर दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. यामधे सुमारे ३ लाख २० हजार रूपयांचा ऐवज लंपास झाला आहे. भर दुपारी गजबजलेल्या ठिकाणी घरफोडी झाल्याने ग्रामस्थांत खळबळ उडाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांनी राजूरला भेट देऊन पोलिसांकडून घटनेची माहिती जाणून घेतली. तसेच तपासाबाबत योग्य त्या सूचना केल्या.
राजूर येथील मनोज शंकरलाल काबरा यांचे मेडिकल दुकान आहे. मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी घर बंद करून दुकानात गेल्या होत्या. येथे श्री जन्मोत्सवनिमित्त यात्रा भरलेली आहे. त्यामुळे राजुरात गर्दी वाढलेली आहे. चोरट्यांनी घर बंद असल्याची संधी साधून घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करून घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज लंपास केला. काबरा यांची पत्नी घरी गेल्यानंतर त्यांना घराचा कोयंडा तुटलेला दिसला. घरात गेल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले. यामधे रोख ९० हजार रूपये, चांदीचे दोन ग्लास, वाटी, पळी, सोन्याचे जोड, करंडे, बिंदीया असा दोन लाख २० हजार रूपये किंमतीचे दागिने लंपास झाल्याचे दिसून आले. मनोज काबरा यांच्या पुतणीचे येत्या १६ तारखेला लग्न आहे. काबरा परिवार लग्नाच्या तयारीत आहे. मुलीच्या लग्नासाठी सोन्या, चांदीचे दागिने खरेदी करून घरात ठेवले होते. मात्र चोरट्यांनी त्याच्यावर डल्ला मारला. काबरा यांचे घर गजबजलेल्या ठिकाणी असून मुख्य रस्त्यापासून हाकेच्या अंतरावर आहे. भरवस्तीत चोरी झाल्याने ग्रामस्थांत खळबळ उडाली आहे. चोरीची माहिती मिळताच भोकरदनचे उपविभागीय अधिकारी ईश्वर वसावे यांच्यासह हसनाबाद ठाण्याचे स.पो.नि.किरण बिडवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच जालन्याहून श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळी ठसेतज्ज्ञांनी भेट दिली. तसेच दरोडा प्रतिबंधक पथकाचे प्रमुख विनोद ईज्जपवार, स्थानिक गुन्हे शाखेचे भाले यांनी भेट दिली. याप्रकरणी राजूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.