भारनियमनामुळे पाणीपुरवठ्याचे कोलमडले नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 01:08 IST2017-09-13T01:07:51+5:302017-09-13T01:08:00+5:30

वीज वितरण कंपनीने सोमवारपासून शहरातील अनेक भागांत भारनियमन सुरू केल्याने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे तोंडचे पाणी पळाले आहे.

The burden of supply of water due to loads of water | भारनियमनामुळे पाणीपुरवठ्याचे कोलमडले नियोजन

भारनियमनामुळे पाणीपुरवठ्याचे कोलमडले नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : वीज वितरण कंपनीने सोमवारपासून शहरातील अनेक भागांत भारनियमन सुरू केल्याने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे तोंडचे पाणी पळाले आहे. दिल्लीगेट आणि जिन्सी पाण्याच्या टाक्यांवर दररोज सहा ते सात तास भारनियमन करण्यात येत असल्याने जुन्या शहरात पाणीपुरवठा करणे अशक्यप्राय होऊन बसले आहे. भारनियमन सुरू असताना पाणीपुरवठा करण्यात येऊ नये अशी मागणी संतप्त नागरिकांकडून मनपाकडे करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील संपूर्ण पाणीपुरवठ्याचे नियोजनच बिघडले आहे.
शहराचा पाणीपुरवठा अगोदरच आॅक्सिजनवर सुरू आहे. नागरिकांना दोन ते तीन दिवसाआड कसेबसे पाणी मिळते. कधी जलवाहिनी फुटते, तर कधी जायकवाडीत विजपुरवठा खंडित होतो. तारेवरची कसरत करीत महापालिका नागरिकांची तहान भागवत आहे. सोमवारपासून वीज वितरण कंपनीने अचानकपणे शहरात सकाळी तीन तास, सायंकाळी तीन तास भारनियमन सुरू केले आहे. या भारनियमनाचा फटका महापालिका आणि सर्वसामान्यांना अधिक बसतोय. दिल्लीगेट आणि जिन्सी येथील पाण्याच्या टाकीवर आठ तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाण्याची लिफ्टिंग बंद आहे. दिल्लीगेट पाण्याच्या टाकीवर ८ वॉर्ड आहेत. एका वॉर्डाची लोकसंख्या जवळपास १० हजार गृहीत धरण्यात येते. जिन्सी टाकीवरही ४ वॉर्डांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. येथील ४० हजार नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याच्या टाक्या भारनियमनातून वगळाव्यात, अशी मागणी मनपा वीज कंपनीकडे करणार आहे. सध्या तरी पाणीपुरवठा विभाग संकटात सापडला आहे.

Web Title: The burden of supply of water due to loads of water