एकाच तज्ज्ञाच्या खांद्यावर स्त्री रुग्णालयाचा भार
By Admin | Updated: May 12, 2015 00:49 IST2015-05-12T00:18:56+5:302015-05-12T00:49:46+5:30
उस्मानाबाद : येथील ६० खाटांच्या स्त्री रुग्णालयात रविवारी १३० गरोदर दाखल झाल्या असून, स्त्रीरोग तज्ज्ञाची ८ पदे मंजूर असताना केवळ एका स्त्रीरोग तज्ज्ञांच्या खांद्यावर रूग्णालयाचा भार आहे़

एकाच तज्ज्ञाच्या खांद्यावर स्त्री रुग्णालयाचा भार
उस्मानाबाद : येथील ६० खाटांच्या स्त्री रुग्णालयात रविवारी १३० गरोदर दाखल झाल्या असून, स्त्रीरोग तज्ज्ञाची ८ पदे मंजूर असताना केवळ एका स्त्रीरोग तज्ज्ञांच्या खांद्यावर रूग्णालयाचा भार आहे़ तर बालरोग तज्ञांचाही अभाव असून, गंभीर प्रसंगी येथील बालकांना जिल्हा रुग्णालयात किंवा खासगी रूग्णालयात नेण्याची वेळ नातेवाईकांवर येत आहे़ विशेष म्हणजे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर वाढीव खाटांच्या मंजुरीसाठी व रिक्तपदे भरण्यासाठी वरिष्ठस्तरावर अपेक्षित पाठपुरावा होत असल्याचेही चित्र आहे़
जिल्हा रूग्णालयात प्रसुतीसाठी येणाऱ्या महिलांचे प्रमाण पाहता तेथील जागा अपुरी पडत होती़ परिणामी संबंधित महिलांसह नातेवाईक, कर्मचाऱ्यांचीही प्रसंगी हेळसांड होत होती़ ही हेळसांड थांबविण्यासाठी शहरातील नाईकवाडी नगर परिसरात जवळपास ७ कोटी रूपये खर्च करून स्त्री रूग्णालयाची टोलेजंग इमारत उभी करण्यात आली आहे़ प्रारंभी येथे ६० खाटांचीच मंजुरी होती़ त्यानंतर वाढीव ४० खाटांचे बांधकाम करण्यात आले आहे़ इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर मागील महिन्यापासून या इमारतीत प्रसुतीसाठी येणाऱ्या महिलांसाठी खुली करण्यात आली़ मात्र, या इमारतीत केवळ ६० खाट असून, दैनंदिन दाखल महिलांची सरासरी संख्या १२० ते १३० च्या आसपास असते़ खाटांचा अभाव असल्याने अनेक महिलांना फरशीवरच लहान मुलाला घेवून उपचार घ्यावे लागत आहेत़
वैद्यकीय अधीक्षकांसह जवळपास वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे येथे मंजूर आहेत़ यात स्त्रीरोग तज्ञांची ८ पदे मंजूर असून, केवळ एकच जागा भरण्यात आली आहे़ त्यामुळे या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खांद्यावर जिल्हा रुग्णालयाचा भार आहे़ बालरोग तज्ञही एकच नियुक्त करण्यात आला आहे़ आणीबाणीच्या प्रसंगी जिल्हा रूग्णालयात नेमणुकीस असलेल्या तज्ञांना महिला रूग्णालयातील रूग्णांवर उपचार करण्याच्या सूचना देण्यात येतात़ त्यातच कर्मचाऱ्यांचाही ताफा कमी आहे़ त्यातच अनेक कर्मचारी महिलांच्या नातेवाईकांशी अरेरावी करीत असल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत़ दरम्यान, या रूग्णालयात प्रसुती झालेल्या मातांना गरम पाणी वेळेवर मिळत नसल्याने बाहेरून किंवा नातेवाईकांच्या घरून पाणी आणावे लागत आहे़ एकीकडे सोलार प्रकल्पावर लाखोंचा खर्च करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मात्र, याकडे साफ दुर्लक्ष होत आहे़ (प्रतिनिधी)