विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:51 IST2017-07-19T00:50:38+5:302017-07-19T00:51:44+5:30
नांदेड: दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी अभ्यासगट, त्यांनी सुचविलेल्या शिफारशी, शाळांकडून घेण्यात येणारी दक्षता अन् शासनाची भूमिका याचा आतापर्र्यंत गांभीर्याने विचारच करण्यात आला नाही़

विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे घटले
शिवराज बिचेवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी अभ्यासगट, त्यांनी सुचविलेल्या शिफारशी, शाळांकडून घेण्यात येणारी दक्षता अन् शासनाची भूमिका याचा आतापर्र्यंत गांभीर्याने विचारच करण्यात आला नाही़ त्यामुळे दप्तराचे ओझे वाहणाऱ्या अनेक चिमुकल्यांना मणक्यांचे आजार जडले आहेत़ याबाबत गुजराती हायस्कूलने पुढाकार घेत दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी दररोजसाठी वेळापत्रकच निश्चित केले आहे़
३० वर्गांमध्ये जवळपास दोन हजार विद्यार्थी असलेल्या या शाळेने प्रत्येक दिवसाचे अन् विषयाचे काटेकोर नियोजन केले आहे़ पूर्वी सर्वच विद्यार्थी सर्वच विषयांची पुस्तके, वह्या सोबत आणत होते़ त्यावर तोडगा काढत, सर्व विषयांच्या पुस्तकांची सम विभागणी केली़ साधारणत: एका बाकावर तीन विद्यार्थी बसतात़ बैठकव्यवस्थेनुसार डाव्या बाजूने बाकावरच्या विद्यार्थ्यांना १ ते ३ असा क्रम देण्यात आला आहे़ त्यामुळे मराठीच्या तासासाठी त्या बाकावरील एकाच विद्यार्थ्याने त्या विषयाचे पुस्तक आणायचे आणि बाकावरील तीनही विद्यार्थ्यांनी त्याच पुस्तकावर लक्ष केंद्रित करायचे़ यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना सर्वच विषयांची पुस्तके आणण्याची गरज नाही़ त्याचबरोबर तुझं-माझं ही भावना जाऊन त्याजागी आपले पुस्तक ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजण्यास सुरुवात झाली़ विषय शिक्षकांना नेमून दिलेल्या दिवसानुसारच वर्गपाठ व गृहपाठ मागविले़
त्यामुळे एकाच दिवशी सर्वच विषयांच्या गृहपाठ व वर्गपाठाच्या वह्या आणण्याची गरज राहिली नाही़ निश्चित केलेल्या वह्यासोबत विद्यार्थ्यांना एक रफ वही सोबत ठेवण्यास सांगण्यात आले आहे़ वर्गात शिक्षकांनी शिकविलेला विषय रफ वहीत घेतल्यानंतर घरी जाऊन तो पुन्हा त्याच विषयाच्या वहीत उतरविण्यात येत आहे़ त्यामुळे विद्यार्थ्यांचे रिव्हिजन होत असून वह्या आणि पुस्तकेही चांगली राहत आहेत़ शाळेतच आरओचे पाणी असल्यामुळे घरुन येताना विद्यार्थ्यांनी बाटलीमध्ये मोजकेच पाणी आणावे अशाही सूचना देण्यात आल्या आहेत़ या सर्व उपाययोजनांमुळे साधारणत: दप्तराचे ओझे दोन ते तीन किलोंने घटले आहे़ त्यामुळे विद्यार्थ्यांच्याही चेहऱ्यावर हास्य फुलले़ सर्वच शाळांनी याप्रकारे विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे़