घुंगर्डे हदगावातही डेंग्यूसदृश्य तापाचा बळी
By Admin | Updated: September 12, 2014 00:24 IST2014-09-12T00:02:18+5:302014-09-12T00:24:38+5:30
जालना/घुंगर्डे हदगाव : गेल्या तीन आठवड्यांपासून जिल्ह्यात काही गावांमध्ये डेंग्यूसदृश्य तापाने थैमान घातले आहे. अंबड तालुक्यातील घुंगर्डे हदगाव येथे या तापामुळे

घुंगर्डे हदगावातही डेंग्यूसदृश्य तापाचा बळी
जालना/घुंगर्डे हदगाव : गेल्या तीन आठवड्यांपासून जिल्ह्यात काही गावांमध्ये डेंग्यूसदृश्य तापाने थैमान घातले आहे. अंबड तालुक्यातील घुंगर्डे हदगाव येथे या तापामुळे भक्तीसिंग अर्जुनसिंंग पवार (वय १४) या बालकाचा ११ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. डेंग्यूसदृश्य तापाने बळींची संख्या ४ वर पोहोचली आहे.
गेल्या दोन आठवड्यांपूर्वी भोकरदन तालुक्यातील पद्मावती, जळगाव सपकाळ, कोदोली, लेहा इत्यादी गावांमध्ये डेंग्यूसदृश्य तापाच्या रुग्णांची संख्या वाढली. त्यात पद्मावती येथील भावंड व जळगाव सपकाळ येथील एक तरूण अशा तिघांचा मृत्यू झाला. या प्रश्नावरून स्थायी समितीच्या सभेत वादळी चर्चा झाली होती. आरोग्य व पंचायत या दोन्ही विभागांच्या हलगर्जीपणामुळे साथरोगांचे तीन बळी गेले, असा आरोप सदस्यांनी केला होता. विशेष म्हणजे याच बैठकीत काही सदस्यांनी वर्तमानपत्रांमधील बातम्यांचे दाखले देत दावे केले, त्यावर पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे यांनी आपण वर्तमानपत्रे वाचत नसल्याचे म्हटल्याने सभागृहाने आश्चर्य व्यक्त केले होते.
एकीकडे प्रशासन दाखवित असलेली अनास्था आणि त्यावर अधिकाऱ्यांकडून मिळत असलेल्या उत्तरांमुळे आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
दरम्यान, घुंगर्डे हदगावात तापाचे आणखी ३० ते ३५ रुग्ण आहेत. भक्तीसिंगच्या मृत्यूमुळे गावात खळबळ उडाली असून आरोग्य विभागाचे पथक अद्यापही दाखल झालेले नाही. गावात डासांचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे धूरफवारणी करण्याची गरज आहे. गोदाकाठचा परिसर असल्याने घुंगर्डे हदगावसह परिसरातील गावांमध्येही साथरोग निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)
भक्तीसिंग पवार हा विद्यार्थी जालना शहरात ज्ञानज्योत प्राथमिक शाळेत आठव्या इयत्तेत शिक्षण घेत होता. काही दिवसांपूर्वी भक्तीसिंग शाळेत रजा घेऊन आपल्या गावाकडे गेला होता. घुंगर्डे हदगावातील घाण, दुर्गंधीमुळे तो तापाने फणफणला. सुरूवातीला कुटुुंबियांनी गावातच प्राथमिक उपचार केले. मात्र ताप राहत नसल्याने त्यास ९ सप्टेंबर रोजी जालना येथील दीपक हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना गुरूवारी त्याचा मृत्यू झाला. भक्तीसिंग याच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. अनुराधा राख यांनी हा मृत्यू डेंग्यूसदृश्य तापाने झाल्याचे आपल्या वैद्यकीय अहवालात म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले.
जालना शहरातही तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र डेंग्यूसदृश्य ताप नसल्याचा दावाही काही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला आहे. ग्रामीण भागात साथरोग मोठ्या प्रमाणावर पसरत आहेत. या पार्श्वभूमीवर सतर्कता म्हणून शहरातही धूरफवारणी करणे आवश्यक आहे. नगरपालिकेच्या वतीने स्वच्छतेच्या कामावर अधिक भर देण्यात आल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले.