कर्जमाफीसाठी बैलगाडी मोर्चा
By Admin | Updated: June 6, 2017 00:46 IST2017-06-06T00:46:25+5:302017-06-06T00:46:54+5:30
जालना : शेतकरी संपास पाठिंबा देण्यासाठी पुकारण्यात आलेल्या जिल्हा बंदला सोमवारी जालना शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला.

कर्जमाफीसाठी बैलगाडी मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क जालना : शेतकरी संपास पाठिंबा देण्यासाठी पुकारण्यात आलेल्या जिल्हा बंदला सोमवारी जालना शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. तर ग्रामीण भागात मात्र, उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरात सकाळी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन भाजीपाला मार्केटमधील खरेदी-विक्री रोखली. संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी महाराष्ट्र स्वराज्य सेना कामगार संघटनेच्यावतीने मामा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. जिल्ह्यातील बदनापूर, भोकरदन वगळता सहा बाजार समित्यांमधील व्यवहार दिवसभर बंद राहिले. दुपारी बारा वाजता जनार्दन मामा यांच्या पुतळ्यास अभिवादन करून बैलगाडी मोर्चास सुरूवात झाली. मोर्चात १५ ते २० बैलगाड्यांसह ग्रामीण भागातील महिला, मुले, युवक व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. मामा चौक, सुभाष चौक, मस्तगड, गांधीचमन, उड्डाणपूल, अंबड चौफुली मार्गे काढलेला हा बैलगाडी मोर्चा दुपारी दीडच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचला. मोर्चात सहभागी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली. त्यानंतर स्वराज्य सेना कामगार संघटनेचे अध्यक्ष मनोज कोलते यांच्यासह शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले. शेतकऱ्यांना हेक्टरी पाच लाखांचे अनुदान द्यावे, शेतात मशागतीची कामे करणाऱ्या शेतकऱ्यांना रोजगार हमीतून १५० दिवसांची मजुरी द्यावी, शेतकऱ्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्तीचा लाभ द्यावा, ५८ वर्षे पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना दरमहा तीन हजारांची पेंशन द्यावी, व्यापाऱ्यांना तूर विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना हमी भावाप्रमाणे पैसे द्यावे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, शेतमालास उत्पादन खर्चावर अधिक ५० टक्के दर लागू करावा आदी मागण्या निवेदनाद्वारे केल्या. मोर्चात संघटनेचे राज्य सचिव प्रल्हाद हेकाडे, साहेबराव अंभोरे, काशीनाथ पडोळे, अरुण वझरकर, एकनाथराव पठाडे, अनिल पाटील, अभिमन्यू लोखंडे यांच्यासह शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. दरम्यान, बैलगाडी मोर्चात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता.