कर्जमाफीसाठी बैलगाडी मोर्चा
By Admin | Updated: May 29, 2017 22:45 IST2017-05-29T22:42:39+5:302017-05-29T22:45:30+5:30
बीड : उदयनराजे भोसले युवासेनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला

कर्जमाफीसाठी बैलगाडी मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शेतकऱ्यांचे कर्ज तात्काळ माफ करा, शेतीमालाला हमी भाव द्या, यासह इतर मागण्यांसाठी उदयनराजे भोसले युवासेनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. सरकारविरोधी घोषणांनी शहर दणाणले होते.
सोमवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चामध्ये शेतकरी बैलगाड्यांसह सहभागी झाले होते. बैलगाडीतील प्रत्येक शेतकऱ्याच्या हातात व बैलाच्या शिंगाला विविध मागण्यांचे फलक लावण्यात आले होते. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा, शेतीमालाला हमी भाव द्या, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. हा मोर्चा नगर रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चात बैलगाड्यांसह शेतकरी व कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याने नगर रोड गर्दीचे खचाखच भरला होता. त्यामुळे काही वेळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक शाखेचे कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आले होते, तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विजय लव्हाळे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात नितीन सगळे, कपिल जरांगे, किरण भोसले, युवराज आगाम, शिवशंकर भोसले, गजानन फाटे, अक्षय पवार, विलास डिडूळ, स्वामी बक्षी, दत्ता बोरवडे, ज्ञानेश्वर बागलानी यांच्यासह शेतकरी, पदाधिकारी, कार्यकर्ते आदींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.