सराफा दुकान फोडले
By Admin | Updated: August 4, 2015 00:28 IST2015-08-04T00:28:49+5:302015-08-04T00:28:49+5:30
सिल्लोड : शहरातील सराफा बाजारामधील चिंतामणी ज्वेलर्स हे सोन्या-चांदीचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी ३ लाख ४ हजारांचे साडेसोळा किलो चांदीचे दागिने लंपास केले.

सराफा दुकान फोडले
सिल्लोड : शहरातील सराफा बाजारामधील चिंतामणी ज्वेलर्स हे सोन्या-चांदीचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी ३ लाख ४ हजारांचे साडेसोळा किलो चांदीचे दागिने लंपास केले. ही घटना रविवारी रात्री घडली. सिल्लोड पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शीतलकुमार भाऊसाहेब गोसावी यांच्या मालकीचे शहरातील मध्यवस्तीत असलेल्या सराफा मार्केटमध्ये चिंतामणी ज्वेलर्स हे सोन्या-चांदीचे दुकान आहे. अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून रविवारी तब्बल साडेसोळा किलो चांदीचे दागिने पळविले. रविवारी आठवडी बाजार होता. त्यामुळे दिवसभर व्यापार करून गोसावी रात्री दुकान बंद करून घरी गेले होते. कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेऊन दुकानाचे शटर उचकटले व दागिने पळविले. या प्रकरणी गोसावी यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिल्लोड शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक एम.के. वानखेडे करीत आहेत, अशी माहिती ठाणे अंमलदार गुलाबराव दाभाडे यांनी दिली. सिल्लोड शहरात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. वाहनचोरी, बाजारपेठेत उभ्या असलेल्या वाहनांना आग लावणे, घरफोडीच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे व्यापारीवर्गात घबराट निर्माण झाली आहे.