उत्कर्ष अन् संरक्षणाचे बांधले २५0 रेशीमबंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 00:09 IST2017-08-07T00:09:35+5:302017-08-07T00:09:35+5:30
महावीर भवनात आयोजित सामूहिक रक्षाबंधन सोहळ्यात २५० बहिणींनी आपल्या भावाला राखी बांधून भावाच्या उत्कर्षाची मंगल कामना व्यक्त करीत आपल्या संरक्षणाची हमीही घेतली.

उत्कर्ष अन् संरक्षणाचे बांधले २५0 रेशीमबंध
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ‘आयुष्यात माझ्याकडून तुझ्याबद्दल कटू शब्द निघाले असतील, तर मला माफ कर,’ असे म्हणत बहिणीने आपल्या भाऊरायाला राखी बांधली. ‘कितीही संकट आले तरी तुझ्या पाठीशी खंबीरपणे मी उभा राहीन व आयुष्यभर तुझे संरक्षण करीन,’ असे वचन भावाने आपल्या लाडक्या बहिणीस दिले. आनंदाने बहिणीने भावाला मिठाई भरविली. हा प्रसंग होता महावीर भवनात आयोजित सामूहिक रक्षाबंधन सोहळ्यातील. या सोहळ्यात २५० बहिणींनी आपल्या भावाला राखी बांधून भावाच्या उत्कर्षाची मंगल कामना व्यक्त करीत आपल्या संरक्षणाची हमीही घेतली.
वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघातर्फे रविवारी हा सामूहिक स्नेहसोहळा पार पडला. धर्मपीठावर विवेकमुनीजी म.सा. आदिठाणा ५ यांची उपस्थिती होती. प्रारंभी, जास्तीत जास्त तपआराधना करण्याचा संकल्प करणाºया महिलांनी संकल्परूपी राखी विवेकमुनीजी म.सा., गौरवमुनीजी म.सा., संभवमुनीजी म.सा., सौरभमुनीजी म.सा., प्रणवमुनीजी म.सा. यांना दिली. यानंतर ५ ते ४० वर्षांपर्यंतच्या २५० भाऊरायांना चार रांगांत बसविले. त्यांच्या समोर बहिणी बसल्या. प्रथम या बहिणींनी भाऊरायांना टिळा लावला व मनगटावर राखी बांधली. भाऊरायांनी बहिणींना भेटवस्तू दिली. बहिणींनी मिठाईने भावाचे तोंड गोड केले.
प्रारंभी, गौरवमुनीजी म.सा. यांनी एका भाऊ-बहिणीची कथा सांगितली. या कथेने भाविक भारावले.
यानिमित्त थाळी सजावट स्पर्धाही घेण्यात आली. धार्मिक सोहळा यशस्वीतेसाठी वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ व गुरुमिश्री युवा मंडळ व प्रभा कन्या मंडळाच्या पदाधिकाºयांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन ताराचंद बाफना यांनी केले, तर अध्यक्ष प्रकाश बाफना यांनी आभार मानले.