अटकेच्या भीतीने बिल्डर कासलीवाल, रुणवाल पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:55 IST2017-09-09T00:55:41+5:302017-09-09T00:55:41+5:30
फ्लॅटधारकाची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारल्यापासून अटकेच्या भीतीने बिल्डर संजय कासलीवाल आणि सुयोग रुणवाल पसार झाले आहेत

अटकेच्या भीतीने बिल्डर कासलीवाल, रुणवाल पसार
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : फ्लॅटधारकाची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारल्यापासून अटकेच्या भीतीने बिल्डर संजय कासलीवाल आणि सुयोग रुणवाल पसार झाले आहेत. पोलीस युद्धपातळीवर त्यांचा शोध घेत आहेत.
याविषयी अधिक माहिती देताना आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीकांत नवले म्हणाले की, शहरातील अनेक बिल्डरांनी शहरातील फ्लॅटधारकांकडून पैसे घेतल्यानंतर त्यांना मुदतीत फ्लॅट न देता त्यांची फसवणूक केल्याच्या तक्र ारी गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना प्राप्त होत आहेत. तक्रारींची गंभीर दखल पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्याकडून घेतली जाते. तक्रारीच्या अनुषंगाने बिल्डरविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश त्यांच्याकडून प्राप्त होत असतात. अशा प्रकारे आतापर्यंत बिल्डर मांडे, बिल्डर कैलास बारवाल यांना पोलिसांनी अटक करून त्यांची रवानगी हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत केली, तर बिल्डर समीर मेहता याच्याविरुद्धही आठ ते दहा दिवसांत तब्बल फसवणुकीचे चार गुन्हे दाखल झाले आहेत. मेहता सध्या पोलीस कोठडीत आहे. व्यवसायात भागीदारी देण्याचे आमिष दाखवून जालना येथील मूळ रहिवासी असलेल्या व्यावसायिकाची ८ कोटी ५१ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डर संजय कासलीवालविरुद्ध २३ जून रोजी क्रांतीचौक ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. आर्थिक गुन्हे शाखा मागील काही महिन्यांपासून या तक्रारीची चौकशी करीत होती. याप्रकरणी अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी बिल्डर कासलीवालने कोर्टात धाव घेतली. सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयाने त्यास अटकपूर्व जामीन नाकारला. तेव्हापासून कासलीवाल पसार झालेला आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
बिल्डर रुणवालविरुद्ध उस्मानपुरा ठाण्यात फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद आहे. या गुन्ह्यात रुणवाल यासही सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला आहे. तेव्हापासून अटकेच्या भीतीपोटी हे आरोपी पसार झाले असल्याचे पो.नि. नवले म्हणाले. आरोपींचा आम्ही शोध घेत असून, ते शहराबाहेर पळून गेल्याचे ते म्हणाले.