बिल्डर पिता-पुत्रावर फसवणुकीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 00:10 IST2017-08-07T00:10:33+5:302017-08-07T00:10:33+5:30
पैसे घेतल्यानंतरही मुदतीत फ्लॅट न देता एका ग्राहकाला तब्बल २५ लाख ७१ हजार ८०० रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी बिल्डर पिता-पुत्रासह तीन जणांविरुद्ध उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

बिल्डर पिता-पुत्रावर फसवणुकीचा गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : पैसे घेतल्यानंतरही मुदतीत फ्लॅट न देता एका ग्राहकाला तब्बल २५ लाख ७१ हजार ८०० रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी बिल्डर पिता-पुत्रासह तीन जणांविरुद्ध उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
बिल्डर सुरेश रुणवाल, सुयोग रुणवाल, त्यांचा मॅनेजर मुकुंद व्यंकटेश डफळ (दशमेशनगर, उस्मानपुरा), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. उस्मानपुरा ठाण्याचे निरीक्षक सतीश टाक म्हणाले की, तक्रारदार संतोष प्रदीप पाटील हे वैद्यकीय व्यावसायिक आहेत. त्यांनी २०१२ मध्ये आरोपी बिल्डर यांच्या नक्षत्रवाडी येथील साइटमधील फ्लॅट खरेदीसाठी आरोपींशी करार केला होता. या करारनाम्यानुसार तक्रारदारांनी बिल्डर्सला एकूण २५ लाख ७१ हजार ८०० रुपये दिले. त्यांनी ही रक्कम २३ नोव्हेंबर २०१२ ते २०१४ या कालावधीत आरोपीच्या दशमेशनगर येथील कार्यालयात दिली. त्यांच्यात २०१४ मध्ये फ्लॅटचा ताबा देण्याची बोली झाली होती. रक्कम घेतल्यानंतरही आरोपींनी तक्रारदारांना फ्लॅट दिला नाही. आरोपींनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर अधिक चौकशी केली असता या बिल्डरांनी त्यांच्या ओळखीचे वैभव भगत (रा. मुकुंदवाडी), एकनाथ पठारे आणि शलाका कहांडळ यांचीही अंदाजे ७५ लाखांची फसवणूक केल्याचे समजले. आरोपींनी अनेकांना गंडा घातल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले; परंतु असे असले तरी अन्य लोकांची जर फसवणूक झाली असेल, तर त्यांनी याविषयी पोलिसांकडे तक्रार करावी. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी बिल्डर आणि त्यांच्या मॅनेजरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला.