बांधकामांवरील बंदी उठविली
By Admin | Updated: September 2, 2014 01:56 IST2014-09-02T01:48:18+5:302014-09-02T01:56:04+5:30
औरंगाबाद : जिल्हा प्रशासनाने दीड महिन्यापूर्वी पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरालगतच्या ३२ गावांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात बांधकामांना मनाई केली होती

बांधकामांवरील बंदी उठविली
औरंगाबाद : जिल्हा प्रशासनाने दीड महिन्यापूर्वी पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरालगतच्या ३२ गावांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात बांधकामांना मनाई केली होती. मात्र, आता समाधानकारक पाऊस झाल्यामुळे जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी ही बंदी उठविली असल्याचे तहसीलदार विजय राऊत यांनी आज सांगितले.
औरंगाबाद जिल्ह्यात यंदा संपूर्ण जून महिना कोरडा गेला. परिणामी पाणीटंचाईची भीषणता वाढली होती. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटेकोरपणे वापर करण्यासाठी जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी १५ जुलै रोजी काही उपाययोजना केल्या होत्या. त्यात पाण्याचा अपव्यय टाळण्याच्या हेतूने शहरालगतच्या ३२ गावांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात बांधकामांना मनाई करण्यात आली होती.
सातारा, देवळाई, वडगाव कोल्हाटी, वरूड काझी, करमाड, कुंभेफळ, लाडगाव, झाल्टा, निपाणी, गांधेली, नायगाव, जटवाडा इ. गावांमध्ये ही मनाई करण्यात आली होती. त्याच्या अंमलबजावणीसाठी तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली पथकाची स्थापनाही करण्यात आली होती. आता जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी दीड महिन्यानंतर ही बंदी उठविली आहे. त्यामुळे नागरिकांना चांगला दिलासा मिळाला आहे.
जायकवाडी धरणातील अत्यल्प पाणीसाठा लक्षात घेऊन जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी १५ जुलै रोजी उद्योगांच्या पाणी कपातीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार उद्योगांच्या पाणीपुरवठ्यात सरासरी २० टक्के कपात करण्यात आली होती.
मात्र, आता जायकवाडी धरणातही सुमारे २४ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे बांधकाम बंदीप्रमाणेच उद्योगांची पाणी कपातही मागे घेतली असल्याचे जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
बांधकाम बंदीच्या आदेशानंतर तहसीलच्या पथकाने काही दिवस संबंधित गावांचे दौरे केले. या दरम्यान, सुरू असलेल्या बांधकामांना नोटिसा बजावण्यात आल्या.
३२ गावांमध्ये अशा ७२ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. दंड किंवा गुन्हे दाखल करण्याची कारवाई मात्र, कोणावरही करण्यात आली नाही. विशेष म्हणजे वरील सर्व गावांमध्ये बंदीनंतरही बिनधास्तपणे बांधकामे सुरूच होती.