महाविद्यालयांची ३० टक्के जादा प्रवेश क्षमता वाढविली
By Admin | Updated: July 9, 2014 00:51 IST2014-07-09T00:20:18+5:302014-07-09T00:51:35+5:30
औरंगाबाद : यंदा १२ वीचा निकाल वाढल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांना ३० टक्के जादा प्रवेश देण्याचा निर्णय विद्या परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला.

महाविद्यालयांची ३० टक्के जादा प्रवेश क्षमता वाढविली
औरंगाबाद : यंदा १२ वीचा निकाल वाढल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांना ३० टक्के जादा प्रवेश देण्याचा निर्णय विद्या परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. मंगळवारी सकाळी ११.३० वाजता विद्यापीठाच्या महात्मा फुले सभागृहात कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या अध्यक्षतेखाली विद्या परिषदेची बैठक सुरू झाली. या बैठकीत कुलसचिव डॉ. धनराज माने, ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. सुरेश झांबरे यांच्यासह ६० सदस्य उपस्थित होते. यावर्षी १२ वीच्या निकालात कमालीची वाढ झाल्यामुळे महाविद्यालयांपुढे प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला होता. सर्वच महाविद्यालयांमध्ये जादा टक्केवारीच्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यास उर्वरित कमी टक्केवारीच्या मुलांनी प्रवेश घ्यायचा कोठे? त्यामुळे या विषयावर बैठकीत चर्चा झाली. राज्य शासनाने जादा निकाल लागल्यामुळे जून महिन्यात महाविद्यालयांना १० टक्के जादा प्रवेश देण्याची मुभा महाविद्यालयांना दिली होती. दरम्यान, अशी परिस्थिती उद्भवल्यास विद्यापीठाला २० टक्के जादा प्रवेश क्षमता वाढविण्याचे अधिकार आहेत. त्यानुसार विद्यापीठाच्या अधिकारातील २० व शासनाने जाहीर केलेले १० टक्के, असे मिळून ३० टक्के जादा प्रवेश देण्याची मुभा महाविद्यालयांना देण्यात आली. पदव्युत्तर अभ्यासक्रमांना आचारसंहिता ज्या महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविले जातात, तेथे संबंधित विषयाचे किमान २ पात्र प्राध्यापक असावेत. जेथे किमान २ पात्र प्राध्यापक नियुक्त केलेले नसतील, अशा महाविद्यालयांना यापुढे पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविण्यासाठी मुदतवाढ दिली जाणार नाही, असा निर्णय विद्या परिषदेने घेतला आहे.