अर्थसंकल्प गेला खड्ड्यात़़़ पदाधिकारी दक्षिण भारतात

By Admin | Updated: August 4, 2014 00:51 IST2014-08-03T23:54:18+5:302014-08-04T00:51:49+5:30

भारत दाढेल, नांदेड मागील पाच महिन्यांपासून महापालिकेचा सन २०१४- १५ चा अर्थसंकल्प मंजुरीच्या प्रतीक्षेत असून पदाधिकाऱ्यांना मात्र याचे कसलेही गांर्भीय उरले नाही़

Budget has gone to the south of South India | अर्थसंकल्प गेला खड्ड्यात़़़ पदाधिकारी दक्षिण भारतात

अर्थसंकल्प गेला खड्ड्यात़़़ पदाधिकारी दक्षिण भारतात

भारत दाढेल, नांदेड
मागील पाच महिन्यांपासून महापालिकेचा सन २०१४- १५ चा अर्थसंकल्प मंजुरीच्या प्रतीक्षेत असून पदाधिकाऱ्यांना मात्र याचे कसलेही गांर्भीय उरले नाही़ आगामी विधानसभा निवडणूक आचारसंहिता तोंडावर असताना मनपा पदाधिकारी व नगरसेवकांनी दक्षिण भारतात सहल काढून अर्थसंकल्पीय सभा लांबणीवर टाकली आहे़
महापालिकेच्या उत्पन्नवाढीला प्राधान्य देत व कोणतीही अतिरिक्त करवाढ न करता मागील महिन्यात स्थायी समितीने १ हजार ४९ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता़ मूळ अर्थसंकल्पात ४५ कोटींची सुधारणा करून तो सर्वसाधारण सभेसमोर मांडला़ त्यानंतर सर्वसाधारण सभेने अभ्यास करण्यासाठी आठ दिवसांचा अवधी मागून घेतला़ मात्र आज पंधरा दिवसानंतरही अर्थसंकल्प मंजुरीसाठी सभा बोलावण्यात आली नाही़ महसुली उत्पन्न व खर्चाच्या नियोजनासोबत शहरातील मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी निधीची तरतूद करीत सन २०१४- १५ चा १ हजार ३ कोटी ४९ लाखांचा अर्थसंकल्प मार्च महिन्यात आयुक्त जी़ श्रीकांत यांनी स्थायी समिती सभेत सादर केला होता़ सन २०१३- १४ चे सुधारित व सन २०१४- १५ च्या मूळ अंदाजपत्रकास मान्यता देवून तो सर्वसाधारण सभेसमोर सादर करण्याची शिफारस करण्यात आली होती़ दरम्यान, सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर तो स्थायी समितीच्या सभेत मंजूर होऊ शकला नाही़ लोकसभेनंतर लगेच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली़ पदवीधर मतदारसंघाची निवडणूक संपल्यानंतर महापालिकेची स्थायी समितीची अंदाजपत्रकीय विशेष सभा २४ जून रोजी आयोजित केली होती़ त्यानंतर सभापती उमेश पवळे यांनी अर्थसंकल्पात ४५ कोटींची सुधारणा करीत कोणताही करवाढ नसलेला अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत सादर केला़ मात्र आधीच उशीर झालेल्या अर्थसंकल्पाला सर्वसाधारण सभेच्या मंजुरीसाठी आता दहा दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे़
आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता तोंडावर असताना हा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत मंजूर होणे आवश्यक आहे़ मात्र याचे कोणतेच गांभीर्य नसलेल्या पदाधिकऱ्यांनी चक्क दक्षिण भारतातील उटी, म्हैसूर, बंगळुरु येथे आठवडाभराची सहल काढली आहे़ महापौर, उपमहापौर, सभापती यांच्यासोबत विरोध पक्षनेता व २४ नगरसेवकांचे एक पथक अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली उटीच्या निसर्गात रममाण होण्यासाठी गेले आहे़
अल्प पावसामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण असून विष्णूपुरी प्रकल्पात दीड महिना पुरेल एवढेच पाणी आहे़ त्यामुळे शहरातील पाणीटंचाईचे मोठे संकट उभे आहे़ शहर अस्वच्छतेच्या विळख्यात सापडले आहे़ कर्मचाऱ्यांचे वेतन दोन महिन्यापासून रखडले आहेत़ एलबीटी वसुलीला व्यापाऱ्यांचा प्रतिसाद मिळत नसल्याने मनपाच्या तिजोरीत खणखणाट आहे़ असे अनेक प्रश्न समोर असताना महापौर अब्दुल सत्तार, उपमहापौर आनंद चव्हाण, सभापती उमेश पवळे यांच्यासोबत विरोधी पक्ष नेता दीपकसिंह रावत व २४ नगरसेवक उटीला रवाना झाले आहेत़ विरोधी पक्ष नेता सत्ताधाऱ्यांसोबत सहलीला गेल्याने महापालिकेला विरोधक उरला नसल्याची चर्चा करण्यात येत आहे़

Web Title: Budget has gone to the south of South India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.