ब्रदरचा त्रास; सिस्टरचा गळफास
By Admin | Updated: June 12, 2016 00:04 IST2016-06-12T00:01:59+5:302016-06-12T00:04:43+5:30
पैठण : येथील शासकीय रुग्णालयातील परिचारिका सोनाली भास्कर कदम (२९) हिने शुक्रवारी राहत्या घरात गळफास घेत मृत्यूला कवटाळले होते.

ब्रदरचा त्रास; सिस्टरचा गळफास
पैठण : येथील शासकीय रुग्णालयातील परिचारिका सोनाली भास्कर कदम (२९) हिने शुक्रवारी राहत्या घरात गळफास घेत मृत्यूला कवटाळले होते. घरात सापडलेल्या सुसाईड नोटच्या आधारे तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी शासकीय रुग्णालयातील तिचा सहकारी कर्मचारी, त्याची बायको व सासरा, अशा तिघांवर गुन्हा दाखल केला.
मयत सोनालीचे वडील भास्कर सखाराम कदम (६१, रा. सुगाव, ता. अकोले, जिल्हा अहमदनगर) यांनी शुक्रवारी रात्री पैठण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीत असे म्हटले आहे की, सोनाली हिने गळफास घेण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे.
या नोटमध्ये तिने तिच्यासोबत काम करणाऱ्या भारत आबासाहेब वाणी, त्याची पत्नी तृप्ती वाणी व तृप्तीचे वडील राजू गुळवे यांची नावे लिहून ठेवली आहेत. या तिघांनी संगनमताने सोनालीचा शारीरिक मानसिक छळ केला. तिला वारंवार लग्न मोडून टाकीन, जीवन बरबाद करून टाकू, अशा धमक्या दिल्या होत्या. ती शासकीय रुग्णालयात असताना तिला भारत वाणी हा मारहाण करायचा. या सर्व त्रासाला कंटाळून सोनालीने मृत्यूला कवटाळले. मयत सोनालीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यावरून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दीड महिन्यापूर्वी झाला विवाह
सोनालीचा विवाह २२ एप्रिल २०१६ रोजी गणेश वाकचौरे (रा. नांदूर शिंगोटे, ता. सिन्नर) या तरुणाशी मोठ्या थाटामाटात झाला होता. नवदाम्पत्याने महिनाभरापूर्वी येथील शासकीय निवासस्थानात संसार थाटला होता. भारत वाणी, त्याची बायको व नातेवाईक माझ्या मुलीला सातत्याने त्रास देत असल्याने भारत वाणी आपला संसार होऊ देणार नाही, या नैराश्यातून अखेर सोनालीने स्वत:ला संपवून टाकले.
या लोकांवर कडक कारवाई करा, असे सोनालीचे वडील पोलिसांना सांगत होते. सुतारकाम करून मुलीला वाढविले, शिकविले, तिला नोकरीस लावले, कर्ज काढून लग्न केले. या लोकांनी त्रास दिल्याने माझी सोनाली मला न बोलता कायमची निघून गेली. माझ्यात तिचा फार जीव होता. मला ती रोज बोलत होती. मग आज का बोलली नाही, म्हणत सोनालीचे वडील धायमोकलून ढसाढसा रडायला लागले आणि सर्वांच्याच डोळ्याच्या कडा पाणावल्या.
दोन दिवसांपूर्वी भांडण?
दोन दिवसांपूर्वी सोनाली घरात एकटी असताना आरोपी वाणी व त्याची पत्नी तृप्ती यांनी तिच्या घरी येऊन तिच्याशी किरकिर घातली होती, अशी चर्चा या परिसरातील रहिवासी करीत होते.
आरोपी फरार
या प्रकरणातील आरोपी भारत वाणी व त्याची पत्नी तृप्ती वाणीसह त्याचा सासरा राजू गुळवे हे घटना घडल्यापासून पैठण येथून फरार झाले आहेत. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे सहायक पोलीस निरीक्षक सुजित बढे यांनी सांगितले.
सुसाईड नोट जप्त
ती सुसाईड नोट पोलिसांनी जप्त केली असून, या नोटमध्ये आरोपींनी तिला त्रास दिला असल्याचे तिने लिहून ठेवले असल्याचे पोलीस निरीक्षक अशोक गिरी व सपानि. सुजित बढे यांनी सांगितले.