हात-पाय तोडले, धड जाळून तलावात फेकले

By Admin | Updated: March 26, 2016 00:58 IST2016-03-26T00:36:39+5:302016-03-26T00:58:14+5:30

औरंगाबाद : वाळूज एमआयडीसी परिसरातील एका तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या तरुणाच्या खुनाचे गूढ उकलण्यात अखेर पोलिसांना यश आले.

Broke hands and feet, burned the torso into the lake | हात-पाय तोडले, धड जाळून तलावात फेकले

हात-पाय तोडले, धड जाळून तलावात फेकले


औरंगाबाद : वाळूज एमआयडीसी परिसरातील एका तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या तरुणाच्या खुनाचे गूढ उकलण्यात अखेर पोलिसांना यश आले. जुन्या वादातून त्याच्याच दोन मित्रांनी हा खून केला. खुनानंतर हात-पाय तोडले. मग धड अर्धवट जाळले. नंतर हे प्रेत आरोपींनी औरंगाबाद तालुक्यातील आडगाव माहुली शिवारातील तलावात फेकून दिले. अशा निर्घृण पद्धतीने हत्या करणाऱ्या दोन्ही संशयित आरोपींना पोलिसांनी अखेर गुरुवारी गोव्यातील मडगाव येथून ताब्यात घेतले आहे.
शिवाजी अर्जुन खरात (३१, रा. बीड बायपास परिसर) असे खून झालेल्या प्राध्यापकाचे नाव आहे. खरात हे बजाजनगरातील एका तंत्रनिकेतन महाविद्यालयात तासिका तत्त्वावर शिकवत होते, असे पोलिसांनी सांगितले. ते १९ मार्च रोजी सायंकाळी हनुमाननगर परिसरात राहणाऱ्या राजेश जाधव (२२) या मित्राला भेटण्यासाठी गेले. रात्री...

(पान १ वरून)
उशिरापर्यंत ते घरी परत आले नाही. त्यांचा मोबाईलही लागेना. मग घरच्यांनी शोध सुरू केला; परंतु काही पत्ता लागला नाही. शेवटी घरच्यांनी २१ मार्च रोजी पुंडलिकनगर पोलीस चौकी गाठून शिवाजी खरात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.
आडगावच्या तलावात आढळले प्रेत
तिकडे औरंगाबाद तालुक्यातील आडगाव माहुली येथे असलेल्या पाझर तलावावर नित्याप्रमाणे २० मार्च रोजी गावातील महिला कपडे धुण्यासाठी गेल्या. कपडे धूत असताना महिलांना पाण्यात प्रेत तरंगत असल्याचे नजरेस पडले. तात्काळ ही माहिती पोलिसांना कळविण्यात आली. माहिती मिळताच करमाड पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी हे प्रेत बाहेर काढले. तेव्हा सर्व जण थक्कच झाले. कारण प्रेताची अवस्था अत्यंत भयानक झाली होती. अंगावर काहीच कपडे नव्हते. दोन्ही हात-पाय तोडून शरीरावेगळे करण्यात आले होते. उरलेले धडही अर्धवट जाळून टाकण्यात आले होते. अशा निर्घृण पद्धतीने खून केल्यानंतर आरोपींनी हे प्रेत या तलावात फेकले होते, असे आढळून आले. प्रेताची ओळख पटू नये म्हणून आरोपींनी अशी अवस्था केली होती. हे प्रेत बाहेर काढून शवागृहात ठेवण्यात आले. मग करमाड पोलिसांनी या प्रेताबाबत सर्वच ठाण्यांमध्ये माहिती कळविली. दरम्यान, इकडे बेपत्ता शिवाजी खरात यांच्या नातेवाईकांनी पुंडलिकनगर ठाण्यात तक्रार दिली. तेव्हा करमाड हद्दीत सापडलेले प्रेत खरात यांचेच तर नाही ना, असा संशय आला आणि पोलिसांनी नातेवाईकांना बोलावून खात्री केली. तेव्हा प्रेत खरात यांचेच असल्याचे स्पष्ट झाले.

आडगाव माहुली तलावात सापडलेले प्रेत शिवाजी खरात यांचेच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पुंडलिकनगर चौकी पोलिसांनी तपासाची चके्र फिरविली. खरात यांचे शेवटचे मोबाईल लोकेशन हनुमाननगर होते. तेथे त्यांचा मित्र राजेश जाधव राहत असल्याचे तपासात समोर आले. मग ग्रामीण पोलिसांनी त्याच्या घरी बुधवारी छापा मारला; परंतु तो घरी आढळला नाही.
४तो चार दिवसांपासून घरातून गायब असल्याचे समजल्यानंतर त्याचा नक्कीच या खुनात हात आहे, याची पोलिसांना खात्री पटली. मग पोलिसांनी त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या अन्य संशयिताचा शोध सुरू केला. अखेर ते या गुन्ह्यानंतर गोव्यास गेल्याचे समोर आले. लगेच पोलिसांचे एक पथक गोव्यात गेले. शुक्रवारी गोव्यातील मडगाव येथे पोलिसांनी राजेश जाधव व अन्य एक संशयित आरोपी हाती लागला. या दोघांना ताब्यात घेऊन ग्रामीण पोलीस पथक औरंगाबादला निघाले आहे.
खरात यांचा इतक्या निर्घृण पद्धतीने का खून करण्यात आला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोपींना औरंगाबादेत आणल्यानंतर या खुनाचे नक्की कारण स्पष्ट होईल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
४ शनिवारी सकाळपर्यंत पोलिसांचे पथक आरोपींना घेऊन औरंगाबादेत येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Broke hands and feet, burned the torso into the lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.