उदयोन्मुख उद्योजकांवर क्रूर काळाचा घाला...
By Admin | Updated: September 19, 2014 01:15 IST2014-09-19T00:18:39+5:302014-09-19T01:15:40+5:30
औरंगाबाद : धडपड करणाऱ्या तीन उदयोन्मुख उद्योजकांवर काळाने सुरतजवळ घाला घातला.

उदयोन्मुख उद्योजकांवर क्रूर काळाचा घाला...
औरंगाबाद : मागासवर्गीय तरुणामधील उद्योजकता विकसित करण्यासाठी सरकारतर्फे मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांना केल्या जाणाऱ्या कर्ज पुरवठ्याच्या आधाराने उद्योग उभे करण्याची धडपड करणाऱ्या तीन उदयोन्मुख उद्योजकांवर काळाने सुरतजवळ घाला घातला. ही वार्ता शहरात धडकताच दलित उद्योजक, कार्यकर्त्यांना दु:खवेग आवरता आला नाही.
स्वप्नील कदम (३२) हे उच्चशिक्षित. नालंदा कला महाविद्यालयाच्या प्राचार्याची धुरा ते समर्थपणे सांभाळत होते. त्यांचे वडील बाबूराव कदम हे रिपब्लिकन चळवळीतील सक्रिय नेते. परंतु स्वप्नील हे राजकारणापासून दूरच राहिले.
शांत व मनमिळावू स्वभाव आणि निर्व्यसनी व्यक्तिमत्त्व असल्यामुळे त्यांचा मित्र परिवार मोठा. मित्रांच्या संपर्कात येऊन स्वप्नील यांनी राजगीर मागासवर्गीय औद्योगिक संस्थेची स्थापना केली. कचनेर फाट्यावर संस्थेमार्फत पीव्हीसी पाईप उत्पादन युनिट स्थापण्याचा प्रस्ताव तयार केला. राज्य सरकारकडून कर्ज मंजूर करून घेत, कचनेर येथे कंपनीची इमारत उभी राहिली. त्यांचा कर्जाचा दुसरा हप्ता मंजूर होऊन पुढील महिन्यात तो मिळणार होता. हप्ता मिळताच उत्पादन सुरू करायचे. वेळ दवडायची नाही, असे ठरवून ते आवश्यक यंत्र साधने पाहण्यासाठी बुधवारी सुरतला जाण्यास निघाले होते. स्वप्नील हे अविवाहित असून, त्यांच्या मागे आई, वडील, एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे.
अरविंद जनार्दन पंडित (४७) हेदेखील उच्चशिक्षित. ते विविध सहकारी संस्थांचे लेखा परीक्षण (आॅडिट) करायचे. परंतु मूळचा धडपड्या स्वभाव. एवढ्या व्यवसायावर शांत होईना. त्यांनीदेखील हर्ष मागासवर्गीय सहकारी संस्थेची उभारणी करून उपरोक्त योजनेंतर्गत कर्ज घेऊन वाळूज औद्योगिक परिसरात प्लास्टिक मोल्डिंगचे युनिट सुरू केले होते.