सेतू बंद; लाभार्थ्यांचे हाल
By Admin | Updated: September 12, 2014 00:03 IST2014-09-12T00:02:31+5:302014-09-12T00:03:59+5:30
हिंगोली : ग्रामीण भागातील बहुतांश महा-ई-सेवा केंद्र बंद असताना सेतू सुविधा केंद्रालाही कुलूप लागले.

सेतू बंद; लाभार्थ्यांचे हाल
हिंगोली : ग्रामीण भागातील बहुतांश महा-ई-सेवा केंद्र बंद असताना सेतू सुविधा केंद्रालाही कुलूप लागले. परिणामी लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांसाठी वणवण भटकंती करावी लागत आहेत. काही तहसील कार्यालयांत तर काही ई केंद्राचा धुंडाळा घेण्याच्या नादात योजनांच्या लाभांच्या तारखा निघून जात असल्यामुळे लाभार्थ्यांची हेळसांड होत आहे.
लाभार्थ्यांना गावातच सर्व प्रमाणपत्रे मिळावी, या चांगल्या उद्धेशाने महा-ई-सेवा केंद्राकडे हे काम वर्ग केले. लाभार्थ्यांची पायपीट थांबेल, ही आशा असताना आजघडीला मनस्ताप वाढला. बहुतांश गावात हे केंद्रच सुरू झालेले नाहीत. शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील केंद्राला कुलूप लागले. मागील चार दिवासांपासून ते उघडले नसल्याने लाभार्थ्यांना घाम फुटला. त्यांनी तत्काळ तहसील कार्यालयाकडे धाव घेतली. येथून त्यांना सेतूकडे बोट दाखविण्यात आले. अनेकांना त्याची माहितच नसल्याने ओरड वाढली. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांकडून या निर्णयाची जनजागृती केली नाही. जवळपास १ हजार फाईल तहसीलकडे वर्ग करण्यात आल्याचे लाभार्थ्यांना सेतूकडून सांगण्यात आले. परंतु तहसीलने या संचिका आल्या नसल्याचे लाभार्थ्यांना सांगितले. गुरूवारी लाभार्थ्यांनी नाराजी व्यक्त केला. आजमितीला अनेक लाभार्थ्यांना तातडीने कागदपत्रांची आवश्यकता आहे. शैक्षणिक ते महसूलपर्यंतच्या कागदपत्रांच्या त्यात समावेश आहे. म्हणून तातडीने महा-ई-सेवा केंद्र सुरू करून लाभार्थ्यांना कागदपत्रे देण्याची मागणी होत आहे. याबाबत उपजिल्हा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी सर्व प्रकारचे प्रमाणपत्रे महा-ई-सेवा केंद्राकडून दिली जाणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)