लाचखोर अभियंता जाळ्यात
By Admin | Updated: August 21, 2015 00:39 IST2015-08-21T00:30:39+5:302015-08-21T00:39:42+5:30
जालना : परतूर येथील जि.प. बांधकाम विभागाचे उपअभियंता भगवान शेवाळे यांना गुत्तेदाराकडून पाच हजारांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरूवारी रंगेहाथ पकडले

लाचखोर अभियंता जाळ्यात
जालना : परतूर येथील जि.प. बांधकाम विभागाचे उपअभियंता भगवान शेवाळे यांना गुत्तेदाराकडून पाच हजारांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरूवारी रंगेहाथ पकडले.
परतूर तालुक्यातील वाहेगाव (श्रीष्टी) येथे दलित वस्ती सुधार योजनेतंर्गत सिमेंट रस्ता व नाला बांधकाम करण्यात आले. या कामाचे एम. बी. रजिस्टरवर व बिलावर सही करून अंतिम बिल मंजूर करण्यासाठी संबंधित तक्रारदार गुत्तेदाराने उपअभियंता शेवाळे यांच्याकडे मागणी केली होती. मात्र शेवाळे यांनी या कामांसाठी पाच हजारांची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची २० आॅगस्ट रोजी पडताळणी केल्यानंतर त्यात लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाली. तेव्हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने परतूर येथील जि.प. उपअभियंता (बांधकाम) कार्यालयात सापळा लावला.
या कामासाठी आपल्या दालनातच तक्रारदाराकडून पंचासमक्ष पाच हजाराची लाच स्वीकारताच पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी पुढील कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले. हा सापळा यशस्वी करण्यासाठी उपअधीक्षक प्रवीण मोरे, पोलिस निरीक्षक व्ही. एल. चिंचोले व त्यांच्या सहकाऱ्यांनी पार पाडली.