लाचेची मागणी; तलाठ्यावर गुन्हा
By Admin | Updated: February 2, 2015 01:12 IST2015-02-02T01:08:56+5:302015-02-02T01:12:45+5:30
कळंब : नवीन विहिरीची सातबाऱ्यावर नोंद करून तसा उतारा देण्यासाठी ५०० रूपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी गोविंदपूर सज्जाच्या तलाठ्यावर कळंब

लाचेची मागणी; तलाठ्यावर गुन्हा
कळंब : नवीन विहिरीची सातबाऱ्यावर नोंद करून तसा उतारा देण्यासाठी ५०० रूपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी गोविंदपूर सज्जाच्या तलाठ्यावर कळंब पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने १५ जानेवारी रोजी गोविंदपूर येथे सापळा लावला होता़ त्यावेळी तलाठ्यांनी तक्रारदाराच्या कामासाठी शासकीय पंचासमक्ष पैशाची मागणी केली होती़
पोलिसांनी सांगितले की, माळकरंजा येथील शरद सतीश निरफळ यांच्या वडिलांच्या नावे गावच्या शिवारात शेती आहे़ येथे नवीन विहीर खोदण्यात आली होती़ याची नोंद सातबाऱ्यावर करून तसा उतारा द्यावा, यासाठी शरद निरफळ यांनी गोविंदपूर सज्जाचे तलाठी रविंद्र शिवाजीराव नवले यांच्याकडे रितसर अर्ज दिला होता़ त्यानंतर तक्रारदार यांनी तलाठी नवले यांची भेट घेवून विहिरीची नोंद केली की नाही, याबाबत विचारणा केली होती़ त्यावेळी तलाठी नवले यांनी नुसता अर्ज देवून काम होत नाही, त्यासाठी पैसे खर्च करावे लागतात, तुमच्या सातबाऱ्यावर विहिरीची नोंद घेऊन तसा फेरफार मंजूर करून घेऊन त्याप्रमाणे सातबारा देण्यासाठी ५०० रुपये लागतील, अशी मागणी केली़ त्यानंतर शरद निरफळ यांनी उस्मानाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार केली होती़ यावरून पोलीस अधीक्षक डॉ़ डी़ एस़ स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक नेकलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक अश्विनी भोसले यांच्यासह पोनि आसिफ शेख, सपोफौ दिलीप भगत, पोहेकॉ सचिन मोरे, चालक पोहेकॉ राजाराम चिखलीकर यांनी गोविंदपूर येथे सापळा रचला होता़ त्यावेळी तलाठी नवले यांनी तक्रारदाराकडे त्याच्या कामासाठी ५०० रूपये लाचेची मागणी केली होती़ त्यावेळी कारवाई करून याचा अहवाल एसीबीने वरिष्ठांकडे पाठविला होता़ वरिष्ठांच्या परवानगीनंतर शनिवारी रात्री कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस उपाधीक्षक अश्विनी भोसले या करीत आहेत़ (वार्ताहर)