अविश्‍वास ठरावाला ब्रेक...

By Admin | Updated: November 19, 2014 13:09 IST2014-11-19T13:03:44+5:302014-11-19T13:09:49+5:30

जिल्हा परिषदेचे सीईओ अभिमन्यु काळे यांच्याविरूद्ध अविश्‍वास ठराव आणण्याच्या प्रयत्नाला दुसर्‍याच दिवशी ब्रेक बसला.

Breakthrough break breaks ... | अविश्‍वास ठरावाला ब्रेक...

अविश्‍वास ठरावाला ब्रेक...

नांदेड : जिल्हा परिषदेचे सीईओ अभिमन्यु काळे यांच्याविरूद्ध अविश्‍वास ठराव आणण्याच्या प्रयत्नाला दुसर्‍याच दिवशी ब्रेक बसला. जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्‍यांना समज देत योग्य मार्गाने काम करण्याचा सल्ला माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी दिल्यानंतर अविश्‍वासाच्या घडामोडी थंडावल्या आहेत. त्यामुळे हे प्रकरण पेल्यातील वादळ ठरले. 
जिल्हा परिषदेत सुरू असलेल्या बोगस बदल्याप्रकरणात अनेक पदाधिकार्‍यांच्या स्वीय सहाय्यकांची नावे पुढे आली. या कारवाईला स्थगिती मिळण्यासाठी प्रयत्न झाले. मात्र त्याला यश आले नाही. परिणामी सीईओंविरूद्ध थेट अविश्‍वास ठरावच आणण्याच्या घडामोडी पडद्याआड सुरू होत्या. या प्रक्रियेला मूर्त स्वरूप येण्यापूर्वीच बुधवारी लोकमतने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्‍यांना शिवाजीनगरात पाचारण करण्यात आले. माजी मुख्यमंत्री खा. चव्हाण यांनी पदाधिकार्‍यांना योग्य समज दिली. तसेच या प्रक्रियेत कोणताही सहभाग राहणार नाही याची खबरदारी घेण्याचीही सूचना दिली. 
या सूचनेनंतर या विषयावर बोलणेही जि. प. च्या पदाधिकार्‍यांनी टाळले. विद्यमान अध्यक्षा मंगला गुंडले यांनी अशा प्रकारचा कोणताही अविश्‍वास जिल्हा परिषदेत येणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच जे कुणी अशा बाबी करू इच्छित असतील त्यांनीही असे करू नये, असा सल्ला दिला. 
असे प्रकार घडल्यास जिल्ह्यात चांगले अधिकारी येण्यास धजावणार नाहीत असेही गुंडले म्हणाल्या. जिल्हा परिषदेच्या सर्वच पदाधिकार्‍यांनी बुधवारी एकत्र येत लोकमतमधील वृत्ताचे मंथन केले. यापुढे जिल्हा परिषदेत काम करताना एकतेचे दर्शन घडविण्याचा संकल्पही या पदाधिकार्‍यांनी केला. 
दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी काळे यांच्या कार्यशैलीबाबत नाराजी व्यक्त करणार्‍या सदस्यांनी जिल्ह्यात शौचालय बांधकामासह अन्य रखडलेल्या कामांनाही गती देण्याची मागणी केली आहे. /(प्रतिनिधी)

Web Title: Breakthrough break breaks ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.