सुपतगाव येथे रस्त्यात आडवे पाडून पतीला विष पाजून मारले
By Admin | Updated: September 12, 2014 00:25 IST2014-09-12T00:22:02+5:302014-09-12T00:25:42+5:30
येणेगूर : सासरी आलेल्या पतीस रस्त्यात आडवे पाडून इतर दोघांच्या सहाय्याने विष पाजून ठार मारले़ ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली असून, या प्रकरणी मुरूम पोलिस ठाण्यात

सुपतगाव येथे रस्त्यात आडवे पाडून पतीला विष पाजून मारले
येणेगूर : सासरी आलेल्या पतीस रस्त्यात आडवे पाडून इतर दोघांच्या सहाय्याने विष पाजून ठार मारले़ ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली असून, या प्रकरणी मुरूम पोलिस ठाण्यात गुरूवारी खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे़
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, उमरगा तालुक्यातील कुन्हाळी येथील प्रल्हाद कोंडीबा बिराजदार (वय-५०) हा आपली सासरवाडी सुपतगाव येथे आला होता़ गुरूवारी पहाटेच्या सुमारास तो सासरवाडीतील घराकडे जात असताना पत्नी चंद्रकला बिराजदार, बालाजी बिराजदार, ज्ञानू परिट यांनी प्रल्हाद बिराजदार याच्या हाता-पायाला धरून खाली पाडले़ पत्नी चंद्रकला हिने प्रल्हाद बिराजदार यास विषारी औषध पाजले़ त्यानंतर परिसरातील नागरिकांनी प्रल्हाद बिराजदार यास उमरगा येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले़ त्यावेळी पोना एस़एल़मिटके यांनी प्रल्हाद याचा जबाब नोंदविला त्यावेळी त्याने वरील तिघांनी आपल्याला विष पाजल्याचे सांगितले़ दरम्यान, प्रल्हाद बिराजदार याचा उपचारादरम्यान गुरूवारी सकाळी मृत्यू झाला़ प्रारंभी या प्रकरणी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती़ त्याच्या मृत्यूनंतर खुनाचे कलम वाढविण्यात आल्याचे तपासाधिकारी सपोनि सोपान सिरसाट यांनी सांगितले़ घटनेनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश कलासागर यांनी घटनास्थळाला भेट दिली़ पत्नीनेच पतीला विष पाजून मारल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे़ (वार्ताहर)
प्रल्हाद बिराजदार यांची पत्नी चंद्रकला ही गत दहा वर्षापासून माहेरीच रहायला होती़ प्रल्हाद हा घटनेच्या दोन दिवसापूर्वी तिला नेण्यासाठी सासरवाडीत आला होता़ मात्र, बुधवारी पहाटेच्या सुमारास पत्नी चंद्रकला व इतर दोघांनी त्यास विष पाजून ठार मारल्याने गावात चर्चेला उधाण आले आहे़