जिल्ह्यातील अवैध धंदे मोडून काढा
By Admin | Updated: May 31, 2014 00:34 IST2014-05-31T00:18:23+5:302014-05-31T00:34:25+5:30
उस्मानाबाद : अवैध दारुविक्रीची माहिती दिल्यानंतर कारवाई करण्याऐवजी ग्रामस्थांनाच तुम्ही दारु पकडून दाखविण्याचे आव्हान देत असाल तर तुम्हाला ठेवलयं कशाला?
जिल्ह्यातील अवैध धंदे मोडून काढा
उस्मानाबाद : अवैध दारुविक्रीची माहिती दिल्यानंतर कारवाई करण्याऐवजी ग्रामस्थांनाच तुम्ही दारु पकडून दाखविण्याचे आव्हान देत असाल तर तुम्हाला ठेवलयं कशाला? असा खरमरीत सवाल पोलिस प्रशासनाला करीत, जिल्ह्यातील अवैध दारुविक्री थांबविण्यासाठी विशेष मोहिम हाती घ्या असे आदेश गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शुक्रवारी प्रशासनाला दिले. यापुढे अशा प्रकारच्या तक्रारी आल्यास प्रसंगी इतर जिल्ह्यातील पथके पाठवून कारवाई करु, याबरोबरच ज्या अधिकार्याच्या क्षेत्रात अशी दारु सापडेल त्याला यासाठी जबाबदार धरण्यात येईल अशी तंबीही पाटील यांनी यावेळी दिली. गृहमंत्री आ. आर. पाटील यांनी शुक्रवारी दुपारी कनगरा गावास भेट देऊन पोलिस मारहाणीत जखमी झालेल्या ग्रामस्थांची विचारपूस केली. यावेळी माजी खा. डॉ. पद्मसिंह पाटील, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक एस. जगन्नाथ, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्यासह जिल्ह्यातील वरीष्ठ अधिकार्यांची उपस्थिती होती. गृहमंत्री पाटील कनगरा येथील मारूती मंदिरात दाखल झाल्यानंतर प्रारंभी माजी खा़डॉ़पद्मसिंह पाटील यांनी सदर प्रकरणाची माहिती दिली़ निरपराध ग्रामस्थांना अमानुषपणे मारहाण झाल्याचे सांगत या प्रकरणातील दोषी अधिकारी, कर्मचार्यावर कठोर कारवाईचे आदेश द्यावेत, अशी मागणी डॉ़पाटील यांनी केली़ पोलिसांच्या मारहाणीत अनेक ग्रामस्थांना गंभीर जखमा झाल्या आहेत़ महिला तसेच चिमुरड्यांनाही पोलिसांनी मारहाण केल्याचे सांगत ही सर्व मंडळी कष्टकरी आहेत़ त्यांच्याकडे उपचारासाठीही पैसा नाही़ अशा स्थितीत त्यांच्या उपचाराची सोय करावी, घरांच्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणीही पाटील यांनी केली़ कनगरा येथील घटना समजल्यानंतर आपण त्याची तातडीने गंभीर घेतल्याचे ते म्हणाले. हा विभाग औरंगाबाद परिक्षेत्रात येत असताना चांगले अधिकारी म्हणून पोलिस दलात ख्याती असलेल्या नांदेडच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांना चौकशी करुन अहवाल देण्यास सांगितले. याबरोबरच या अहवालाची वाट पाहत न बसता प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या चार कर्मचार्यांना तातडीने निलंबितही केले आहे. अवैध प्रकार रोखणे पोलिसांचे काम आहे. गावात अवैध दारूविक्री होत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिल्यानंतर कारवाई करण्याऐवजी ‘तुम्ही दारू पकडून द्या’, असे कसे काय सांगता ? अशी दारू पकडताना अवैध दारूविक्रेत्याकडून महिलांवर काही बिकट प्रसंग ओढावला असता तर त्याची जबाबदारी कोणी घेतली असती असा सवाल गृहमंत्री पाटील यांनी केला़ तक्रार आल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने योग्य कारवाई करायला हवी होती़ असे न करता अवैध दारू नष्ट करण्याचा प्रकार झाला़ ही बाब गंभीर आहे़ दारू सांडून दिल्यानंतर महिलांशी बाचाबाची झाली़ त्यातून मारहाण झाली आणि या सर्व घटनेचे पर्यवसान निरपराध ग्रामस्थांना घरात घुसून अत्याचार करण्यापर्यंत गेले़ वरिष्ठ अधिकार्यांनी यामध्ये गंभीर चुका केल्या़ योग्य नियंत्रण आणि योग्य आदेश देण्याचे भान या अधिकार्यांनी बाळगले असते तर ही दुर्दैवी घटना घडली नसती, असेही गृहमंत्री पाटील यावेळी म्हणाले़ आपल्या हातात कायदे आहेत ते जनतेचे रक्षण करण्यासाठी, हेच कायदे हातात घेऊन तुम्ही निरपराधांना झोडपले आणि यासाठी मला इथे यावे लागते, ही खरेतर दु:खाची गोष्ट आहे़ दोषींना पाठीशी घालायचे तर सोडाच; त्यांना कठोर कारवाई झाली पाहिजे़ ज्यांनी बेकायदेशीर कृत्य केले त्यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही होईल़ पण कायद्याप्रमाणे गुन्हेही दाखल होतील, असे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी केले़ (जिल्हा प्रतिनिधी)जखमेवर मीठ... म्हणे, तणाव नव्हे, गावात आनंद...कनगरा येथे २६ मे च्या मध्यरात्री झालेल्या घटनेने उस्मानाबादसह महाराष्ट्र हादरला आहे़ मात्र, त्यानंतरही जिल्हा पोलिस प्रशासनाला या प्रकरणाचे गांभिर्य लक्षात आलेले नसल्याचेच दिसून येते़ पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयातील जनसंपर्क विभागाने शुक्रवारी सकाळी प्रसिध्दीपत्रक जारी केले़ या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी पुढाकार घेऊन स्वत: गावात जाऊन गावकर्यांबरोबर शांतता प्रस्थापित करण्यासाठी बैठक घेतली़ या बैठकीमुळे गावकर्यांना मोठा दिलासा मिळाला असून, निर्माण झालेले गैरसमज व तणाव संपुष्टात आला आहे़ पोलिसांच्या सकारात्मक भूमिकेमुळे गावकरी आनंदित असल्याचेही या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे़पोलिस जनतेचे मित्रच कनगरा मारहाण प्रकरणामुळे पोलिसांची प्रतिमा डागाळली असली तरी शेवटी पोलिस हेच आपले संरक्षक आहेत़ हे जनतेने लक्षात घ्यावे़ अशा एखाद्या दुर्दैवी घटनेवरून पोलिसांबद्दलचे मत खराब करू नका़ पोलिस दलात कार्यरत असलेली ही सर्व मुले शेतकर्यांचीच आहेत़ १८-१८ तास काम करून जनतेची काळजी घेणारे, जीवाची पर्वा न करता नक्षल्यांशी लढा देणारे, वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी म्हणून रात्रंदिवस रस्त्यावर राबणार्या पोलिसांची संख्या अधिक आहे़ चूक झाली ती आम्ही खुल्या मनाने मान्य करतो़ मात्र, इथून पुढे पोलिस आणि तुमचे संबंध मित्रतत्वाचे, सलोख्याचे राहिले पाहिजेत़ त्यासाठी पोलिसांबरोबरच ग्रामस्थांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन आर. आर. पाटील यांनी केले़बेंबळी पोलिस ठाण्यातील कर्मचार्यांना मारहाण झाली, हा प्रकारही चुकीचा आहे़ मात्र, चार कर्मचार्यांना मारले म्हणून तुम्ही अख्खे गाव झोडपता, हा अधिकार तुम्हाला कोणी दिला ? असा खडा सवाल गृहमंत्री पाटील यांनी केला़ मारहाण झाल्यानंतर कायद्यानुसार कारवाई करता आली असती़ त्यासाठी मध्यरात्री घरात घुसून मारहाण करण्याची काय गरज होती़ या संपूर्ण प्रकरणात वरिष्ठ अधिकार्यांनी चुकीचे मार्गदर्शन केल्याचे तसेच चुकीच्या पद्धतीने नियंत्रण ठेवल्याचे स्पष्ट होते़ अहवाल दोन दिवसांनी येईलच परंतु ग्रामस्थ, महिला तसेच इतरांशी चर्चा केल्यानंतर कनिष्ठांपेक्षा वरिष्ठ अधिकार्यांनी केलेल्या चुका ठळकपणे पुढे येतात, असेही गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सांगितले़ सदर घटनेत संबंधित असलेल्या प्रत्येक विभागाने नियमानुसार व कायद्यावर बोट ठेवून काम केले असते तर ही दुर्दैवी घटना टळली असती़ पोलिसांबरोबरच दारूबंदी व महसूल विभागाने अवैध दारूविक्रेत्यावर कारवाई करण्यास हलगर्जीपणा केल्याचे ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर दिसून येते़ या सर्व विभागाच्या वरिष्ठांनी आपापल्या कर्मचार्यांची चौकशी करावी, या संपूर्ण प्रकरणाकडे माझे वैयक्तिक लक्ष असेल, असेही गृहमंत्री पाटील यावेळी म्हणाले़ अवैधदारूविक्री करणारा या भागात अनेकवर्षापासून सक्रिय आहे़ पोलिसांनी त्याच्यावर वेळोवेळी गुन्हेही दाखल केले आहेत़ मात्र, जामिनावर सुटल्यानंतर तो पुन्हा दारूविक्री करीत असल्याचे दिसून येते़ सदर इसमाच्या हद्दपारीचा प्रस्ताव २०११ मध्ये सादर करण्यात आला होता़ या प्रस्तावावर संबंधित अधिकार्याने कार्यवाही का केली नाही असा सवाल गृहमंत्री आऱआऱपाटील यांनी केला़ महिलांच्या तक्रारीबरोबरच पोलिस पाटलांनीही अवैध दारूविक्रीबाबत अहवाल दिला होता़ त्यानंंतरही सदर इसमावर कसलीही कारवाई होत नाही हा प्रकार अक्षम्य असल्याचे सांगत या प्रकरणातील दोषींवरही संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी कारवाई करावी, असे आदेश गृहमंत्री पाटील यांनी दिले़