बारदान्याअभावी तूर खरेदीला लागतोय ‘ब्रेक’ !
By Admin | Updated: March 3, 2017 01:34 IST2017-03-03T01:32:26+5:302017-03-03T01:34:24+5:30
कळंब : तालुक्यात दहा वर्षानंतर तुरीचे पीक बहरले असले तरी या तुरीला बाजारात कोणी विचारत नसल्याचे विदारक चित्र निर्माण झाले

बारदान्याअभावी तूर खरेदीला लागतोय ‘ब्रेक’ !
कळंब : तालुक्यात दहा वर्षानंतर तुरीचे पीक बहरले असले तरी या तुरीला बाजारात कोणी विचारत नसल्याचे विदारक चित्र निर्माण झाले असून, तालुक्यात तुरीचे केवळ दोन शासकीय खरेदी केंद्रे सुरू असून या केंद्रांवरील खरेदीस बारदान्याच्या तुटवड्यामुळे वारंवार ब्रेक लागत आहे. यामुळे खुल्या बाजारात कोणी घेइना अन् शासकीय खरेदी केंद्रावर मेळ लागेना अशी विचित्र कोंडी शेतकऱ्यांची झाली आहे.
कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम हा प्रमुख हंगाम आहे. या हंगामातील तूर हे प्रमुख पीक आहे. तालुक्यात खरीप हंगाम २०१६ मध्ये जवळपास ८ हजार हेक्टरवर तुरीचा पेरा झाला होता. यावर्षी पाऊसकाळ चांगला झाल्याने व हवामान अनुकूल असल्याने पीक बऱ्यापैकी बहरले होते. यामुळे दहा वर्षात प्रथमच कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांना तुरीच्या उत्पन्नाचा हातभार लागला असल्याने आनंद व्यक्त झाला होता. कळंब तालुक्यातील व लगतच्या वाशी, केज तालुक्यातीलही असंख्य शेतकरी आपल्या तूर विक्रीस कळंब येथील कृषी बाजारास प्रथम प्राधान्य देतात. यानुसार यंदा बहुंताश शेतकऱ्यांचा या मार्केटला तूर घालण्यावर भर होता. यातच कळंब शहरात २ व ग्रामीण भागात ५ अशी तालुक्यात ७ शासकीय तूर खरेदी केंद्रे सुरू होऊन या ठिकाणी प्रति क्विंटल ५ हजार ५० रुपये दराने खरेदी सुरू झाली. कळंब बाजारात हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांचा शासकीय खरेदी केंद्रावर माल घालण्यावर भर होता. यानुसार शासकीय खरेदी केंद्रावर मोठी गर्दी झाली होती. सर्व काही सुरळीत होत आहे असे चित्र दिसत असतानाच या ७ केंद्रांपैकी शेतकऱ्यांच्या कंपन्यानी सुरू केलेली इटकूर, खामसवाडी, गौर या पाच ठिकाणचे केंद्रे अचानक बंद पडली. याशिवाय चालू असलेल्या तालुका खरेदी-विक्री संघाच्या व खामसवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या केंद्राला बारदान्याचा तुटवडा ही समस्या जाणवू लागली. यामुळे खुल्या बाजारात कोणी विकत घेइना अन् शासकीय केंद्रावर मेळ लागेना, अशी विदारक स्थिती सध्या शेतकऱ्यांना जाणवत आहे.(वार्ताहर)