बीपी, शुगरचा वाढतोय धोका !
By Admin | Updated: April 6, 2017 23:33 IST2017-04-06T23:32:34+5:302017-04-06T23:33:22+5:30
उस्मानाबाद : बदलती जीवनशैली, वाढती व्यसने, अपुरी झोप अशा एक ना अनेक कारणांनी उच्च रक्तदाब (बीपी), मधुमेहसारख्या (शुगर) असंसर्गजन्य आजारांचा विळखा वाढताना दिसत आहे़

बीपी, शुगरचा वाढतोय धोका !
उस्मानाबाद : बदलती जीवनशैली, वाढती व्यसने, अपुरी झोप अशा एक ना अनेक कारणांनी उच्च रक्तदाब (बीपी), मधुमेहसारख्या (शुगर) असंसर्गजन्य आजारांचा विळखा वाढताना दिसत आहे़ मागील वर्षभरात असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत झालेल्या तपासणीमध्ये बी़पी़, शुगरचे तब्बल ९६५७ रुग्ण आढळून आले आहेत़ विशेषत: यामध्ये बीपीच्या रुग्णांमध्ये महिलांची संख्या अधिक असल्याची बाब समोर आली आहे़
वयाची ३० ते ३५ वर्षे ओलांडलेल्या नागरिकांमध्ये आज बीपी या जीवघेण्या आजारासह शुगरचे प्रमाण आढळून येत आहे़ देशात मधुमेहाचे ६़२३ टक्के, बिपीचे प्रमाण १५़९ टक्के, ह्दयाच्या झटक्याचे प्रमाण ०़९ टक्के, आहे़ तर विविध प्रकारच्या कॅन्सरमुळे देशात पाच लाख नागरिकांचा मृत्यू होतो़ बदलेली जीवन शैैली, धूम्रपान, असमतोल आहार, मानसिक तणाव आदी कारणांमुळे या आजारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे़ या आजाराला आळा घालण्यासाठी शासनाकडून सन २०१४ पासून असंसर्गजन्य रोग प्रतिबंध कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे़ या कार्यक्रमांतर्गत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासह नागरिकांची तपासणी करून असंसर्गजन्य आजार असलेल्यांवर मोफत औषधोपचार सुरू करण्यात आले आहेत़ सन २०१६-१७ मध्ये जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये करण्यात आलेल्या तपासणीमध्ये ९६५७ बीपी, शुगरचे रुग्ण आढळून आले आहेत़ या कार्यक्रमांतर्गत एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत १ लाख ४६ हजार १०६ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे़ यात १८५१ पुरूषांना तर १५२७ महिलांना अशा एकूण ३३७८ जणांना मधुमेहाची लागण झाल्याचे समोर आले आहे़ तर २१३८ पुरूषांना व २९७७ महिलांना अशा एकूण ५११५ जणांना बीपीची लागण झाल्याचे समोर आले आहे़ विशेषत: बीपी या आजाराची लागण होण्यात महिलांचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे़ तर बीपी आणि शुगरची लागण झालेल्यांची संख्या ११६४ आढळून आली आहे़ यात ५७१ पुरूषांसह ५९३ महिलांचा समावेश आहे़