वाळूज महानगर : मोबाईल घेऊन दिला नाही, या कारणावरून १६ वर्षीय मुलाने तिसगाव येथील खवड्या डोंगरावरून उडी मारून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण वाळूज परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अथर्व गोपाल तायडे (वय १६, रा. साजापूर शिवार, मूळ गाव जळगाव जामोद, जि. बुलढाणा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो सध्या वाळूज येथे राहत होता व पोलिस भरतीसाठी प्रशिक्षण घेत होता. काही दिवसांपासून अथर्वने आईकडे मोबाईल घेण्यासाठी आग्रह धरला होता. मात्र, त्याच्या आईने नकार दिल्याने नाराज झालेल्या अथर्वने रविवारी डोंगरावरून खाली उडी मारली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
जखमी अथर्वला अतुल आडे व स्वप्निल पवार या दोघांनी तातडीने रुग्णालयात नेले; मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सलीम शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. अथर्वच्या आईने फोडलेला हंबरडा उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता. वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे.