कंत्राटदाराला कोट्यवधींचे पार्टी गिफ्ट

By Admin | Updated: June 23, 2016 01:36 IST2016-06-23T01:02:59+5:302016-06-23T01:36:25+5:30

विकास राऊत , औरंगाबाद सिडकोतील उड्डाणपुलाचे २० जून रोजी थाटात लोकार्पण झाले असले तरी त्या पुलाखाली अजून कोट्यवधी रुपयांची कामे शिल्लक आहेत

Bounty party gift to the contractor | कंत्राटदाराला कोट्यवधींचे पार्टी गिफ्ट

कंत्राटदाराला कोट्यवधींचे पार्टी गिफ्ट


विकास राऊत , औरंगाबाद
सिडकोतील उड्डाणपुलाचे २० जून रोजी थाटात लोकार्पण झाले असले तरी त्या पुलाखाली अजून कोट्यवधी रुपयांची कामे शिल्लक आहेत. ही कामे निविदेत समाविष्ट नसताना आणि कंत्राटदाराने पुलाच्या कामाला ५ महिने विलंब केलेला असताना दंड लावण्याऐवजी ५ कोटींची बक्षीसरुपी कामे दिली आहेत. काम संपल्यानंतर देण्यात येणारे ‘पार्टी गिफ्ट’ म्हणून त्या कामांना मंजुरी मिळण्यासाठी रस्ते विकास महामंडळाच्या मुख्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याव्यतिरिक्त आणखी काही अतिरिक्त कामांचे गिफ्ट कंत्राटदाराला देण्याचा विचार एमएसआरडीसी करीत आहे. त्या पुलाखालील कामांसाठी कंत्राटदाराला आॅगस्टअखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची चर्चा कानावर आली आहे.
पुलाच्या कामावर ५६ कोटी २५ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. त्यात आणखी १० कोटींच्या कामांची भर पडण्याचा अंदाज आहे. पुलाची एकूण लांबी १ कि़ मी. आहे. तर रुंदी १४ मीटर असून, उंची ५.५ मीटर आहे. पूल पूर्ण करण्यासाठी २४ महिन्यांची मुदत होती. पुलाच्या कामाला ३० महिने लागले. असे असताना २ महिने शिल्लक वाढवून देण्याच्या हालचाली सुरू आहेत.
गटर, पाईपलाईन, पुलावर ‘कॅटआय’(वाहतूक रिफलेक्टर) बसविण्याचे काम बाकी आहे. तसेच फुटपाथ, पुलाखाली पेव्हरब्लॉक बसविण्याचे काम बाकी आहे. सर्व्हिस रोडदेखील पूर्ण करणे बाकी आहे. डीपी शिफ्ट करणे आदी कामे शिल्लक आहेत. ही कामे पूर्ण होण्यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. सर्व्हिस रोड तर पावसाळ्यानंतर बांधावा लागणार आहे. त्यामुळे एमएसआरडीसी जरी आॅगस्टअखेरपर्यंत सर्व कामे करण्याचा दावा करीत असले तरी डिसेंबरअखेरपर्यंत पुलाखालील कामे सुरू राहतील, अशी शक्यता आहे.

Web Title: Bounty party gift to the contractor