घाटीच्या दारातच दोघांचे गेले प्राण

By Admin | Updated: September 26, 2016 00:38 IST2016-09-26T00:30:45+5:302016-09-26T00:38:56+5:30

औरंगाबाद : मराठवाड्यासह शेजारील जिल्ह्यांतील रुग्णांचे आशास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घाटी रुग्णालयाच्या आवारातच बेवारस अवस्थेत राहणाऱ्या दोन अनोळखी रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू झाला.

Both of them died in the valley door | घाटीच्या दारातच दोघांचे गेले प्राण

घाटीच्या दारातच दोघांचे गेले प्राण

औरंगाबाद : मराठवाड्यासह शेजारील जिल्ह्यांतील रुग्णांचे आशास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घाटी रुग्णालयाच्या आवारातच बेवारस अवस्थेत राहणाऱ्या दोन अनोळखी रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू झाला. घाटीच्या वाहन पार्किंगमध्ये मदतीच्या अपेक्षेने पडून राहणाऱ्या दोन रुग्णांनी अनुक्रमे २४ आणि २५ सप्टेंबर रोजी प्राण सोडले. या दोन्ही मृतांची ओळख पटविण्यासाठी त्यांचे मृतदेह पोलिसांनी घाटीतील शवागारात ठेवले आहेत.
२५ सप्टेंबर रोजी सकाळी पावणेनऊ वाजेच्या सुमारास घाटीतील सुरक्षारक्षक पी. एस. खरात यांना अंदाजे ४० वर्षांचा अनोळखी इसम पार्किंगमध्ये बेवारस अवस्थेत पडलेला दिसला. त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने त्यास घाटीतील अपघात विभागात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी बेगमपुरा ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृताची उंची ५ फूट, रंग सावळा, अंगात खाकी शर्ट आणि काळी पॅण्ट, चेहरा गोल, दाढी वाढलेली, मध्यम बांधा असे वर्णन आहे.
तर २४ सप्टेंबर रोजी सकाळी सव्वादहा वाजेच्या सुमारास बाह्यरुग्ण विभागासमोरील वाहन पार्किंगमध्ये बेवारस अवस्थेत सापडलेल्या अनोळखी इसमासही अपघात विभागातील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मृताचे अंदाजे वय ५० वर्षे असून, उंची ५ फूट २ इंच, चेहरा लांबट, दाढी वाढलेली आहे. डोक्याला रुमाल बांधलेला, हिरवा शर्ट आणि पांढरे धोतर त्यांनी घातलेले आहे. या वर्णनाच्या व्यक्तीला ओळखणाऱ्यांनी बेगमपुरा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोहेकॉ. एस. आर. पवार यांनी केले आहे.
मृताचे नातेवाईक सापडेनात
घाटीतील सुरक्षारक्षकांना १४ आॅगस्ट रोजी अपघात विभागातील फुटपाथवर ६५ वर्षीय अनोळखी वृद्धाचा मृतदेह बेवारस अवस्थेत आढळला होता. त्यांनी या घटनेची माहिती अपघात विभागातील डॉक्टर आणि बेगमपुरा पोलिसांना कळविली. पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ओळख पटविण्यासाठी मृताचे शव घाटीतील शवागृहात ठेवले. या घटनेला ४० दिवस उलटले तरी मृताच्या नातेवाईकांचा शोध लागलेला नाही. मृताची उंची पाच फूट, रंग सावळा, चेहरा लांबट, अंगावर पांढरा शर्ट आणि पांढरी पॅण्ट असे वर्णन आहे.
आणखी पाच जण मृत्यूच्या प्रतीक्षेत
घाटीच्या प्रवेशद्वारालगत असलेल्या वाहन पार्किंगमध्ये खाण्या-पिण्याअभावी आणि आजाराने ग्रासलेले पाच ते सहा जण पडून आहेत. घाटीतील निष्णात डॉक्टरांसह शहरातील तथाकथित समाजसेवक याच मार्गावरून घाटीत ये-जा करतात. मात्र या बेवारस गरीब रुग्णांकडे ते ढुंकूनही पाहत नाहीत.
या रुग्णांच्या रक्ताच्या लोकांनीच त्यांना नाकारलेले असल्याने ही मंडळी समाजातील अन्य लोकांकडूनही अपेक्षा ठेवत नाहीत. मात्र उपचार करण्याचा वसा घेतलेल्या डॉक्टर आणि नर्सेस यांच्याकडूनही का दुर्लक्ष व्हावे?

Web Title: Both of them died in the valley door

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.