भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

By Admin | Updated: August 18, 2016 00:52 IST2016-08-18T00:35:18+5:302016-08-18T00:52:46+5:30

जाफराबाद : भरधाव एस.टी बसने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील साले व मेहुणा जागीच ठार झाले.

Both of them died in a major accident | भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

भीषण अपघातात दोघांचा मृत्यू


जाफराबाद : भरधाव एस.टी बसने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील साले व मेहुणा जागीच ठार झाले. घटना ही चिखली मेहकर फाट्याजवळ बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. जाफराबाद तालुक्यातील रास्तळ व देऊळगाव राजा गावावर शोककळा पसरली आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला ही दुर्घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
रास्तळ (ता.जाफराबाद, जि. जालना) येथील विठ्ठल भगवान जाधव (२२) हा त्यांचे मेहुणे राजेंद्र गणेश शिंदे (३०, रा. देऊळगावराजा) यांच्यासोबत मेहकर फाट्यानजीकच्या आॅटोमोबाईलवर आपल्या नातेवाईकाला भेटण्यासाठी दुचाकीने निघाले होते. चिखली ते देऊळगाव राजा मार्गावर मेहकर फाट्यापासून चिखलीकडे येत असताना समोरून भरधाव वेगात येणाऱ्या औरंगाबाद ते खामगाव बस (एमएच-४०-एन-९६९८) ने दुचाकी (एमएच-२१-एके-२२५२) ला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला.
मयताचा चुलतभाऊ शिवहरी जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल करून बसचालकाला अटक केली आहे. मृत विठ्ठल जाधव हा अविवाहित होता. त्याच्या पश्चात आई, वडील, तीन बहिणी, एक भाऊ असा परिवार आहे.
तसेच राजू शिंदेच्या मागे आई, वडील, पत्नी, भाऊ व एक बहीण आहे. ऐन रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला ही दुर्घटना घडल्याने बहिणी भावांना मुकल्या असून, साला व मेहुण्याच्या मृत्यूने देऊळगावराजा व रास्तळ गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Both of them died in a major accident