लाच स्वीकारताना दोघे चतुर्भुज
By Admin | Updated: July 12, 2017 00:33 IST2017-07-12T00:27:08+5:302017-07-12T00:33:46+5:30
बीड : जिल्ह्यात दोन ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने कारवाया केल्या.

लाच स्वीकारताना दोघे चतुर्भुज
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात दोन ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने कारवाया केल्या. धारूर पंचायत समितीत संगणक आॅपरेटर तर माजलगाव तालुक्यातील मंजरथ येथील तलाठ्याला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. या दोन्ही कारवाया मंगळवारी करण्यात आल्या.
मंजरथ येथील धुराजी कचरू शेजाळ (२७) याने तक्रारदाराच्या आजोबांच्या नावे असलेली शेतजमिन वारसाहक्काने तक्रारदारांच्या वडिलांच्या नावे करून सातबारा उतारा देण्यासाठी दीड हजार रूपयांची लाच मागितली होती. मंगळवारी माजलगाव शहरातील समता कॉलनीत लाच स्वीकारताना शेजाळ याला रंगेहाथ पकडण्यात आले.
तर धारूर पंचायत समितीतील संगणक आॅपरेटर गोविंद माणिक कांदे (२५) याने तक्रारदार यांच्या इंदिरा आवास योजने अंतर्गत मजूर झालेल्या घरकुलाचा तिसरा हप्ता मंजूर करण्यासाठी एक हजार रूपयांची लाचेची मागणी केली होती. मंंगळवारी धारूर शहरातील गायकवाड गल्लीतील महा-ईसेवा केंद्रात लाच स्विकारण्याचे ठिकाण ठरले. तत्पूर्वी एसीबीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सापळा लावला. लाच स्वीकारताच त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. एकाच दिवशी दोन कारवाया झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.