पोलिसांच्या दोन्ही पथकांना आरोपी सापडेनात !
By Admin | Updated: April 4, 2017 23:20 IST2017-04-04T23:18:01+5:302017-04-04T23:20:53+5:30
उस्मानाबाद : तुळजापूर येथील यात्रा अनुदान निधीत अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले तत्कालीन नगराध्यक्ष, नगरसेवक, मुख्याधिकाऱ्यांसह ठेकेदार अद्यापही फरार आहेत़

पोलिसांच्या दोन्ही पथकांना आरोपी सापडेनात !
उस्मानाबाद : तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील यात्रेसाठी सन २०११-१२ मध्ये शासनाकडून आलेल्या यात्रा अनुदान निधीत अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले तत्कालीन नगराध्यक्ष, नगरसेवक, मुख्याधिकाऱ्यांसह ठेकेदार अद्यापही फरार आहेत़ पोलिसांनी संबंधितांना अटक करण्यासाठी तैनात केलेल्या दोन्ही पथकांना गुन्हा दाखल झाल्याच्या आठव्या दिवशी सायंकाळी उशिरापर्यंत एकही आरोपी जेरबंद करण्यात यश आलेले नाही़ या प्रकरणात कागदपत्रांची तपासणी करण्यात येत असून, आजवर दहा जणांचे जबाब नोंदविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले़
तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील यात्रेसाठी शासनाकडून प्रत्येक वर्षी यात्रा अनुदान देण्यात येते़ या यात्रा अनुदानातून भाविकांना सोयी-सुविधा पुरवाव्यात हा उद्देश असतो़ मात्र, सन २०११-१२ च्या यात्रेसाठी दीड कोटी रूपयांचे अनुदान आले होते़ मात्र, तत्कालीन नगराध्यक्षांचे वडिल वारल्याने ते पालिकेत आले नाहीत़ त्यांच्याकडील पदभारही कोणाकडे नसल्याने यात्रा अनुदान निधीतून भाविकांसाठी सुविधा पुरविण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली नव्हती़
तर सेवेसाठी पालिकेत कार्यरत असलेले रोजंदारी कर्मचारी, कायमस्वरूपी कामगार, कर्मचारी, पालिकेची वाहने, भाडेतत्त्वावरील वाहने, पालिकेत स्टॉक असलेले जंतू नाशके, ब्लिचिंग पावडर, तुरटी, विद्युत साहित्य आदी बाबींचा वापर करण्यात आला होता़ परिणामी यात्रा अनुदानाचा खर्च झाला नाही़ मात्र, याच कालावधीत निवडणूक होऊन दुसरे सत्ताधारी सत्तेत आले़ बनावट कागदात्रांच्या आधारे यात्रा अनुदानात १ कोटी ६२ लाखाचा अपहार करून तत्कालीन नगराध्यक्ष, नगरसेवक, मुख्याधिकारी, अधिकाऱ्यांसह ठेकेदारांनी आपले उखळ पांढरे करून घेतल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ माने यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात दिली होती़ या तक्रारीवरून तत्कालीन नगराध्यक्षा अर्चना विनोद गंगणे, संबंधित नगरसेवक, तत्कालीन मुख्याधिकारी संतोष टेंगळे, तत्कालीन लेखापाल अविनाश राऊत, ठेकेदारांविरूध्द गुन्हा दाखल झाला होता़ मात्र, गुन्हा दाखल होऊन जवळपास आठ दिवसांचा कालावधी लोटला तरी एकही पदाधिकारी, अधिकारी, नगरसेवक किंवा ठेकेदार पोलिसांच्या गळाला लागलेला नाही़ पोलिसांनी तपासासाठी दोन पथके तैनात केली असून, या पथकांमध्ये महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले़ पोलिसांना आरोपींचा सुगावा लागण्यापूर्वीच ते जागा बदलत असल्याचे सांगण्यात येत आहे़ दरम्यान, कागदपत्रांची पडताळणी सुरू असून, आजवर दहा जणांचे जबाब नोंदविले आहेत़ या प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपींना जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही तपासाधिकारी राजतिलक रोशन यांनी सांगितले़