दोघा भावांनी केले पारधीवाड्याचे नाव रोशन
By Admin | Updated: July 14, 2014 01:03 IST2014-07-14T00:15:45+5:302014-07-14T01:03:16+5:30
भास्कर लांडे, हिंगोली जन्मजात गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या पारधी जातीत झालेला जन्म आणि घरात अठराविश्वे दारिद्र्य होतं.

दोघा भावांनी केले पारधीवाड्याचे नाव रोशन
भास्कर लांडे, हिंगोली
जन्मजात गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या पारधी जातीत झालेला जन्म आणि घरात अठराविश्वे दारिद्र्य होतं. तशात वडिलाचं छत्र बालपणीच हरवलं. परिस्थितीमुळं दिवसभराच्या कामानंतरच घरी चूल पेटायची. नेहमी दोन वेळच्या खाण्याचे वांधे होते. परिणामी शिक्षणाचा विषय कोसोमैल दूर होता; पण गरिबीचे चटके अधिक सोसलेल्या आईने हातात फावड्याऐवजी पेन दिली. पुढे शिक्षणातही रफरफ झाली. कधी पुस्तके नव्हती तर कधी बससाठी पैसे नव्हते; पण हिंमत हरली नव्हती. अशा विपरित परिस्थितीत खाकी वर्दीचे ध्येय उराशी बाळगून सरावासाठी दिवसरात्र एक केला. त्याचे फलस्वरूप पहिल्याच भरतीत पप्पू रामसिंग काळे यशस्वी झाला. त्याच्या प्रेरणेने आणि एकत्र सरावाने चुलत भावाने सोबतच यशोशिखर गाठले. दोघांची आनंद वार्ता घरी कळताच पप्पूच्या आईच्या डोळ्याला अश्रूंच्या धारा लागल्या. ‘पारधीवाड्याचे नाव रोशन केल्याचे सांगत’ आई बायनाबाई काळे यांनी आनंदाश्रूला वाट मोकळी करून दिली.
महाराष्ट्रातील संत नामदेव यांच्या जन्मस्थानामुळे नर्सी गावाचे नाव भारतभर पोहोचले आहे. याच गावातील काळे कुटुंबियांतील दोन युवकांनी पोलिस बनण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. मुळात भटकंती करणारा पारधी समाज असल्यामुळे स्थावर मालमत्तेचा विषयच नव्हता. परिणामी पिढ्यान्पिढ्या घरात अठराविश्व दारिद्र्य होते. बिकट परिस्थितीत जन्मलेल्या पप्पू काळे याचे वडील लवकर जग सोडून निघून गेले. आपसूकच कुटुंबाचा पूर्णत: बोजा बायनाबाई काळे यांच्यावर येवून पडला. तशात शेती नव्हती, घरात धान्य नव्हते. दोनवेळच्या खाण्याचे मोठे वांधे होते; पण गरिबीचे चटके सहन करीत आलेल्या बायनाबार्इंनी मुलगा पप्पूच्या हातात फावड्याऐवजी पेन दिली. अडाणी बायनाबाई पप्पूला ‘काही तरी बन, बदल घडीव, घरात चांगले दिवस आण’ असे नेहमी सांगत होती. अगदी अशीच परिस्थिती संजू हरी काळे (वय २१) याच्या घरीही होती. दरम्यान, दहावी निघून गेली, अकरावीसाठी पप्पू आणि संजूने हिंगोली गाठली; परंतु विद्याशाखा, विषय निवडायचे ज्ञान नव्हते, कोणाचे मार्गदर्शन नव्हते. प्रवाहाप्रमाणे कला शाखा निवडली. कॉलेजचे दिवस सुरू झाले; मात्र नर्सीतून नियमित ये-जा करण्यासाठी पैसाही नव्हता. परिणामी दोन-दोन दिवस कॉलेजचे तोंड पहायला मिळत नव्हते. त्यातच सकाळी एकदा जेवून आल्यानंतर पोटात दिवसभर अन्नाचा कण नसायचा. दिवसभराच्या कॉलेजनंतर घरी गेल्यावर जेवण मिळायचे. दरम्यान अभ्यासात सातत्य राहिले नसल्याने बारावीला अपेक्षित टक्केवारी आली नाही; परंतु आईचा उपदेश थांबलेला नव्हता. काय करावे, या विचारात असताना आदर्श कॉलेजच्या मैदानावर सराव करताना बहुतांश मुले दिसून आली आणि खाकी वर्दी अंगावर चढवायची, हे ध्येय निश्चित झाले. मार्ग सापडला पण अडचणी संपल्या नव्हत्या. भरतीच्या सरावासाठी गोळा नव्हता, ट्रॅक नव्हता, शूजचा प्रश्न तर यक्ष प्रश्न होता. कोणतेही साधन नसताना दोघांनी नर्सी येथेच सराव सुरू केला. दोघांची मेहनत, जिद्द, चिकाटी पाहून सपोनि अशोक जाधव यांनी त्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य विक्रम जावळे यांनी पुस्तके दिली. नेत्रतज्ज्ञ डॉ. किशन लखमावार यांनी ट्रॅकसूट आणि शूज दिला आणि तेव्हापासून सरावाला गती मिळाली. भरतीची तारीख निघाली. दोघांनी सोबतच सातारा येथे फॉर्म भरला. भरतीत उंची मापली, गोळा फेकला, लांब उडी ठोकली आणि ५ किलो मीटर धावण्यात पहिला क्रमांक पटाकावला. ९० मार्काचे मैदान मारले, लेखी परीक्षेचा पेपरही दोघांनी उत्तम सोडविला. काही दिवसानंतर आॅनलाईन निकाल लागला. दोघांनी नेटकॅफे गाठून लिस्ट पाहिली. एकापाठोपाठ दोघांचे नंबर पाहताच पप्पू आणि संजूला जग जिंकल्यासारखे झाले. मोबाईल उचलला आणि आईला लावला. दोघेही सातारा येथील भरतीत यशस्वी झाल्याचे सांगताच बायनाबाईला काहीही शब्द सुचले नाहीत. त्या थेट रडायला लागल्या. मुलांच्या शिक्षणासाठी वेचलेले आयुष्याचे फळ मिळाले. रात्रंदिवस एक केलेल्या कष्टाचे चीज केले. डोळ्यातील आनंदाश्रू संपल्यानंतर ‘ तू पारधीवाड्यात पहिला नंबर आणलास, समद्या पारधीवाड्याचं नाव रोशन केलंस’ असे शब्द आईने काढल्याचे पप्पू काळे याने सांगितले.