उत्पन्न वाढीसाठी ‘झेडपी’ घेणार बीओटीचा आधार !
By Admin | Updated: November 20, 2014 00:47 IST2014-11-20T00:46:46+5:302014-11-20T00:47:42+5:30
उस्मानाबाद : स्व: उत्पन्न अत्यल्प असल्याने जिल्हा परिषदेने ते वाढीसाठी आता प्रयत्न सुरू केले आहेत. जिल्हाभरात जि.प.च्या मालकीच्या जागा आहेत

उत्पन्न वाढीसाठी ‘झेडपी’ घेणार बीओटीचा आधार !
उस्मानाबाद : स्व: उत्पन्न अत्यल्प असल्याने जिल्हा परिषदेने ते वाढीसाठी आता प्रयत्न सुरू केले आहेत. जिल्हाभरात जि.प.च्या मालकीच्या जागा आहेत. मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागेवर आता शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार आहे. यासाठी ‘बीओटी’ तत्त्वाचा आधार घेण्यात येणार आहे. हा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. जिल्हाभरातील अकरा ठिकाणच्या जागेसंदर्भात यावेळी प्राथमिक स्तरावर चर्चाही झाल्याचे अध्यक्ष अॅड. धीरज पाटील यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या स्व: उत्पन्नावर नजर टाकली असता फारशी वाढ होत नसल्याचे दिसून येते. कारण ज्या पद्धतीने उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये वाढ होणे अपेक्षित होते, त्या पद्धतीने झालेली नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेला स्वत:च्या हिमतीवर नाविन्यपूर्ण उपक्रम राबविताना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ही बाब निदर्शनास आल्यानंतर जिल्हा परिषदेचे नूतन अध्यक्ष यांनी आता उत्पन्न वाढीवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये जिल्हा परिषदेच्या मालकीच्या रिकाम्या भूखंडाचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा मोक्याच्या ठिकाणी असलेल्या भूखंडावर शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याचे ठरले आहे.
दरम्यान, हे सर्व करण्यासाठी जिल्हा परिषद आर्थिकदृष्ट्या फारशी सक्षम नसल्याने यासाठी ‘बीओटी’ तत्वचा आधार घेतला जाणार आहे. सदरील प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी समितीही गठित करण्याचा निर्णय झाला. समितीचे अध्यक्षपद हे जि.प. अध्यक्ष अॅड. धीरज पाटील यांच्याकडे राहिल. त्यानंतर सदस्य म्हणून बांधकाम सभापती, सत्तारूढ व विरोधी पक्षाचे प्रत्येकी एक सदस्य, जिल्हाधिकारी, सीईओ, व्यवसायिक तज्ज्ञ, स्थानिक जानकार व्यक्ती, वास्तू शास्त्रज्ञ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, कार्यकारी अभियंता (बां), अति. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा समावेश असेल.
जागेची माहिती सादर
बांधकाम विभागाने बैठकीमध्ये जिल्हाभरातील अकरा ठिकाणच्या जागेची माहिती सादर केली. यामध्ये सधन कुक्कुट पालन (उस्मानाबाद), जि.प. प्रशाला बेंबळी, जुना नागरी दवाखाना तुळजापूर, पंचायत समिती उमरगा, प्राथमिक शाळा पोलिस निवासस्थान उमरगा, पशुवैद्यकीय दवाखाना लोहारा, जुनी पंचायत समिती इमारत लोहारा, जि.प. भांडार गृह लोहारा, पंचायत समिती कळंब, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय जिल्हा परिषद वसतिगृह कळंब आणि वाशी पंचायत समितीसमोरील खुल्या जागेचा समावेश आहे. (प्रतिनिधी)