बोरणा मध्यम प्रकल्पाचा सांडवा झाला खिळखिळा
By Admin | Updated: July 2, 2014 00:18 IST2014-07-01T23:11:30+5:302014-07-02T00:18:10+5:30
मांडवा: परळी तालुक्यातील मांडव्याजवळील कासारवाडी येथील बोरणा नदीवर उभारण्यात आलेला सांडवा खिळखिळा झाला आहे.

बोरणा मध्यम प्रकल्पाचा सांडवा झाला खिळखिळा
मांडवा: परळी तालुक्यातील मांडव्याजवळील कासारवाडी येथील बोरणा नदीवर उभारण्यात आलेला सांडवा खिळखिळा झाला आहे. या सांडवा फुटला तर परिसरातील सुमारे १० हजारावर नागरिकांच्या जीवितास धोका पोहोचण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
१९७३ मध्ये बोरणा नदीवर सांडवा बांधण्यात आला. ४१ वर्षांचा कालावधी उलटूनही अद्याप या सांडव्याची साधी डागडुजी करायलाही प्रशासनाला वेळ मिळाला नाही. प्रकल्प उभारणी करताना निर्माण केलेला सांडवा आजही त्याच अवस्थेमध्ये तग धरुन आहे. या सांडव्याची पूर्णपणे दुरवस्था झाली असून, जास्त पाऊस झाल्यावर हा सांडवा फुटण्याची दाट शक्यता परिसरातील नागरिकांमधून वर्तविली जात आहे. सांडव्याच्या भिंतीला लावण्यात आलेले दगट गळून पडले आहेत तर सांडव्याला ठिकठिकाणी भेगा व मोठमोठे छिद्र पडले असून, यातून पाणी झिरपत आहे. त्यामुळे धरणाच्या पायथ्याला असलेल्या कासारवाडी, लोकरवाडी, उखळी आदी गावांमधील सुमारे १० हजार लोकांच्या जीवितास धोका पोहचण्याची शक्यता आहे. १९७२ मध्ये झालेल्या भीषण दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने मांडवा गावाजवळून वाहणाऱ्या बोरणा नदीवर प्रकल्पाची उभारणी केली. त्यामुळे मांडवा, मरळवाडी, मिरवट, कासारवाडी, लोकरवाडी, उखळी, नंदनज, सारडगाव आदी गावांच्या शिवारामधील कालवा डावा व उजवा लिफ्ट सिंचनाद्वारे १३७६ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आल्याने परिसरातील जमिनी हिरव्या झाल्या. या धरणाची लवकर दुरुस्ती न केल्यास उपोषण करण्यात येईल, असा इशारा कासारवाडीचे माजी उपसरपंच धनंजय गुट्टे यांनी दिला. तर उपविभागीय अभियंता टी.जे.फारुखी म्हणाले, ६५ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले असून, मंजुरी मिळताच काम सुरू करू. (वार्ताहर)