मनपाच्या प्राणिसंग्रहालयात वाघांच्या मिलनावर बंधने
By Admin | Updated: January 4, 2016 00:21 IST2016-01-03T23:49:03+5:302016-01-04T00:21:30+5:30
सुनील कच्छवे ,औरंगाबाद एकीकडे वाघांची संख्या वाढविण्यासाठी जगभरात जोरदार प्रयत्न सुरू आहेत. व्यापक प्रमाणावर मोहिमा राबविल्या जात आहेत. तर दुसरीकडे औरंगाबादेत मात्र,

मनपाच्या प्राणिसंग्रहालयात वाघांच्या मिलनावर बंधने
सुनील कच्छवे ,औरंगाबाद
एकीकडे वाघांची संख्या वाढविण्यासाठी जगभरात जोरदार प्रयत्न सुरू आहेत. व्यापक प्रमाणावर मोहिमा राबविल्या जात आहेत. तर दुसरीकडे औरंगाबादेत मात्र, नेमकी उलट परिस्थिती आहे. पालिकेच्या प्राणिसंग्रहालयात चक्क वाघांची संख्या वाढू नये म्हणून काळजी घेतली जात आहे. त्यासाठी दोन वर्षांपासून येथील वाघांच्या मिलनावर बंधने घालण्यात आली आहेत. प्रजनन थांबविण्यासाठी नर आणि मादींना जाणीवपूर्वक वेगळे ठेवण्यात येते.
शहरातील मनपाचे सिद्धार्थ प्राणिसंग्रहालय हे मराठवाड्यातील एकमेव आहे. त्यात इतर प्राण्यांप्रमाणेच वाघ, हत्ती, सिंह यांचाही समावेश आहे. जगभरात वाघांची संख्या घटत असताना या प्राणिसंग्रहालयात मात्र, वाघांची संख्या येथे चांगलीच वाढली आहे. कधी काळी चंदीगडहून पट्टेदार (पिवळा) वाघांची एक आणि ओरिसातून पांढऱ्या वाघांची एक जोडी, असे एकूण चार वाघ येथे आणण्यात आले होते. त्यांना झालेल्या पिल्लांमुळे वाघांच्या संख्येत सतत भर पडत गेली. आतापर्यंत या प्राणिसंग्रहालयात वाघांची एकूण १२ पिल्ले जन्माला आली. सध्या येथे ९ पट्टेदार (पिवळे) आणि ३ पांढरे, असे १२ वाघ आहेत. शिवाय इंदौर, बोरीवली, पुणे आदी ठिकाणच्या प्राणिसंग्रहालयांना आतापर्यंत ६ वाघ देण्यात आले आहेत.
प्राणिसंग्रहालयाची क्षमता पाहता येथे ८ पेक्षा अधिक वाघ ठेवता येत नाहीत. तरीही सध्या १२ वाघ आहेत. म्हणून आता आणखी संख्या वाढू नये याची काळजी प्राणिसंग्रहालय प्रशासनाकडून घेतली जात आहे. वाघीण एका वेळी १ ते ५ दरम्यान पिल्ले देते. आतापर्यंत येथे एकाच वेळी एका वाघिणीने जास्तीत जास्त चार पिल्ले दिलेली आहेत. त्यामुळे एखादी वाघिणीने पिल्ले जन्माला घातली तर एवढी पिल्ले ठेवायची कुठे, असा प्रश्न मनपासमोर आहे. म्हणून दोन वर्षांपासून नर आणि मादींना वेगवेगळे ठेवले आहे. कोणत्याही परिस्थितीत हे एकत्र येऊ नयेत, त्यांचे मीलन होऊ नये याची काळजी घेतली जाते. आतापर्यंत जन्मलेल्या वाघांची संख्या पाहता औरंगाबादेतील वाघांचा प्रजनन दर इतर भागांच्या तुलनेत चांगला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.