बंद पडलेली पॉलिसी सुरू करण्यासाठी उकळले पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2016 23:53 IST2016-03-26T23:53:08+5:302016-03-26T23:53:08+5:30
औरंगाबाद : बंद पडलेली पॉलिसी सुरूकेल्यावर चांगली रक्कम मिळेल, अशी बतावणी करून तिघा भामट्यांनी एका वकिलाला २७ हजार रुपयांना गंडा घातला.

बंद पडलेली पॉलिसी सुरू करण्यासाठी उकळले पैसे
औरंगाबाद : बंद पडलेली पॉलिसी सुरूकेल्यावर चांगली रक्कम मिळेल, अशी बतावणी करून तिघा भामट्यांनी एका वकिलाला २७ हजार रुपयांना गंडा घातला. ही घटना छावणी परिसरात घडली. या प्रकरणी छावणी ठाण्यात शुक्रवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खुशी माथूर, प्रियंका आणि विनोद बगिया, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या भामट्यांची नावे आहेत. अॅड सुमित सुधाकर सुवर्णा (२९, रा. लक्ष्मी कॉलनी) यांनी छावणी ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी २००८ मध्ये मॅक्स लाईफ इन्शुरन्समध्ये पॉलिसी काढली होती. त्यात २० ते २५ हजार रुपये गुंतविले होते. पुढे पॉलिसीचे हप्ते भरणा न झाल्यामुळे ही पॉलिसी बंद पडली होती. काही दिवसांपूर्वी सुवर्णा यांना मॅक्स लाईप इन्शुरन्समधून बोलत असल्याचे सांगून खुशी माथूर, पुन्हा प्रियंका व पॉलिसी एजन्ट असल्याचे सांगून विनोद बगिया या तिघांनी फोन केला. पॉलिसी सुरूकेल्यास १ लाख ५४ हजार रुपये भेटतील. मात्र त्यासाठी १२ हजार ३५४ रुपये भरावे लागतील, अशी थाप मारली. त्यांच्या या आमिषाला बळी पडून सुवर्णा यांनी १२ हजार ३५४ रुपये भरणा केला. मात्र, काही दिवसांनी त्याच भामट्यांनी पुन्हा फोन करून आणखी १५ हजार रुपये भरल्यास १ लाख ८३ हजार रुपये मिळतील, अशी बतावणी केली. यावेळीही सुवर्णा यांनी रक्कम भरणा केली. त्यानंतर सुवर्णा यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी छावणी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.