विहिरीतील मतपेट्यांचे गुढ उकलेना
By Admin | Updated: November 10, 2014 01:16 IST2014-11-10T01:08:43+5:302014-11-10T01:16:19+5:30
जालना : शहरात दहा मतपेट्या आढळून आलेल्या घटनेचे गांभीर्य विचारात न घेता महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांनी शनिवार, रविवार या दिवशी सुटीचा आनंद घेण्यातच वेळ घातला.

विहिरीतील मतपेट्यांचे गुढ उकलेना
जालना : शहरात दहा मतपेट्या आढळून आलेल्या घटनेचे गांभीर्य विचारात न घेता महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांनी शनिवार, रविवार या दिवशी सुटीचा आनंद घेण्यातच वेळ घातला. मात्र या प्रकारामुळे सर्वसामान्य जनतेत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. या पेट्या कोणत्या निवडणुकीच्या आहेत, याविषयीची चर्चा रंगत आहे.
कदीम जालना पोलिसांनी पंचनामा करून सदर दहा मतपेट्या तहसीलच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिल्या आहेत. पोलिसांनी पंचनामा करतांना पेट्या बांधण्यासाठी वापरण्यात येणारे दोन कपडे आढळून आले होते. त्याची नोंद पंचनाम्यात घेण्यात आली नाही. हे कपडे मतपेटी सील करून बांधून ठेवण्यासाठी वापरण्यात येतात. एका उघड्या पेटीत कागद जाळण्यात आल्याने पेटी पूर्णत: काळवंडलेली होती. ही नोंद घेण्यात आली आहे.
बीट जमादार मोरे पाटील यांनी सांगितले, कपडा जप्त करण्यात आला नाही. दहा पेट्यांमध्ये एक उघडी होती. दोन चेपलेल्या होत्या. उर्वरित सात पेट्या बंद स्थितीत होत्या. मात्र त्यात काहीच नव्हते. सर्वच पेट्या रिकाम्या होत्या. पेटींवर जिल्ह्याची नोंद आणि कंपनीचाही शिक्का होता. त्यामुळे पुढील तपास आता महसूल विभागाला करावा लागणार आहे. पोलिस ठाण्यात केवळ नोंद घेण्यात आली आहे. सर्वच पेट्या महसूल विभागाकडे देण्यात आल्या आहेत. दुचाकीचा सांगाडा मात्र पोलिसांनी आपल्या ताब्यात ठेवला आहे. (प्रतिनिधी)
पडकी विहीर पाण्याने काठोकाठ भरलेली आहे. काल दहा पेट्या काढण्यात आल्यानंतर त्यात आणखी मतपेट्या असल्याची खात्रीही पोलिस व महसूल प्रशासनाने घेतली नाही. सामाजिक कार्यकर्ते गणेश सुपारकर पाणी उपसा करण्याचा सल्ला दिला होता. मात्र यंत्रणा नसल्याचे पोलिस व महसूल प्रशासनाकडून सांगण्यात आले.
४या विहिरीत जिवंत साप आहेत. हे माहित असूनही धोका पत्करून सागर वाघ व राजू हिवाळे या दोघा युवकांनी पेट्या बाहेर काढल्या. या पेट्या काढणाऱ्यांच्या पाठीवर पोलिस व महसूल प्रशासनाने शाबासकीची थापही मारली नाही. त्यांना रोख पारितोषिक देणे गरजेचे होते. माजी नगरसेवक काशीनाथ मगरे यांनी पोलिसांना पाण्यात उतरा असे आवाहन केले होते.