परीक्षेत बोगस‘गिरी’!
By Admin | Updated: December 30, 2014 01:19 IST2014-12-30T00:51:10+5:302014-12-30T01:19:09+5:30
औरंगाबाद : भूमी अभिलेखच्या शिपाई भरतीच्या परीक्षेत आपला भाऊ पास व्हावा, यासाठी बोगस नावाचा वापर करून बोगस‘गिरी’ करणाऱ्या बीड पोलीस मुख्यालयातील लिपिकासह

परीक्षेत बोगस‘गिरी’!
औरंगाबाद : भूमी अभिलेखच्या शिपाई भरतीच्या परीक्षेत आपला भाऊ पास व्हावा, यासाठी बोगस नावाचा वापर करून बोगस‘गिरी’ करणाऱ्या बीड पोलीस मुख्यालयातील लिपिकासह तीन भावांना जवाहरनगर पोलिसांनी परीक्षा केंद्रात रविवारी दुपारी रंगेहाथ अटक केली.
आरोपींमध्ये लिपिक गजानन लक्ष्मण गिरी (२५, रा. सेनगाव, हिंगोली) याचा सख्खा भाऊ राजू गिरी (२३) व चुलतभाऊ तुकाराम गिरी (२४, रा. वसमत, हिंगोली) यांचा समावेश आहे. या घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, आरोपी राजू गिरी हा बेरोजगार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून तो नोकरीच्या शोधात होता. तर त्याचा भाऊ गजानन हा बीड पोलीस मुख्यालयात लिपिक म्हणून कार्यरत आहे आणि तुकाराम एमपीएससीची तयारी करीत आहे. तुकाराम व गजानन हे दोघे हुशार आहेत. त्यांच्या तुलनेत राजू कमी हुशार आहे.
बोगस नावाचा वापर
भूमी अभिलेख विभागात शिपाईपदासाठी जाहिरात निघाली होती. तेव्हा आपल्या भावाला (राजूला) या परीक्षेत काहीही करून पास करायचे आणि सरकारी नोकरी लावायचीच, असा निश्चय गजानन आणि तुकारामने केला.
या परीक्षेत आॅनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा होती. आॅनलाईनमध्ये जर एकापाठोपाठ फॉर्म भरले आणि नाव सारखे असेल तर परीक्षा क्रमांकही एकापाठोपाठ येतात, याची कल्पना असल्याने
या तिघांनी एक शक्कल
लढविली.
गजाननने स्वत: गजानन ऐवजी राजानन अशा बोगस नावाने अर्ज भरला. त्यापाठोपाठ राजूचा अर्ज भरला आणि मग तुकारामचा. त्यामुळे तिघांचाही बैठक क्रमांक एकापाठोपाठ आला. राजू मध्ये असल्याने पुढच्या आणि मागच्या भावाने पाहून त्याने उत्तरपत्रिका सोडवायची असे ठरले.
या तिघांचा नंबर औरंगाबादेतील एसएफएस हायस्कूल केंद्रावर लागला. हे तिघे दुपारी परीक्षेसाठी आले. हॉलमध्ये बसले आणि ठरल्याप्रमाणे राजूने कॉपी करून लिहिण्यास सुरुवात केली.
दरम्यान, या गिरी बंधूंच्या बोगस‘गिरी’ची माहिती एका खबऱ्याने जवाहरनगर पोलिसांना कळविली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हाशमी व त्यांच्या सहकाऱ्यांनी परीक्षा केंद्रात छापा मारला. तेथे हे तिघे रंगेहाथ सापडले. तिघांना अटक करण्यात आली आहे.
तिघांविरुद्ध जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलीस निरीक्षक हाशमी हे स्वत: तपास करीत आहेत.