बोगस चाचणीला बसणार लगाम...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2017 23:48 IST2017-02-06T23:43:57+5:302017-02-06T23:48:31+5:30
जालना : चुकीची अथवा घाई गडबडीत टेस्ट दाखवून वाहन परवाना मिळविणाऱ्यांना आता चाप बसणार आहे

बोगस चाचणीला बसणार लगाम...!
जालना : चुकीची अथवा घाई गडबडीत टेस्ट दाखवून वाहन परवाना मिळविणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. सहायक उपप्रादेशिक कार्यालयातील वाहन टेस्ट ट्रॅकवर दोन वायफाय ट्रायपॉड कॅमेरे बसविण्यात आले आहेत. काही एजंट अथवा काही चिरीमिरी देऊन टेस्ट पूर्ण करणाऱ्यांना लगाम बसणार आहे.
आरटीओ कार्यालयात अनेकदा जास्त गर्दीचा फायदा घेत वाहनचालक चुकीच्या पद्धतीने वाहन चालवून अथवा परिपूर्ण प्रशिक्षण नसताना टेस्ट पूर्ण करून परवाना मिळवितो. हे कॅमेरे बसविण्यात आल्याने आरटीओ कार्यालयातील वाहन निरीक्षकांनाही वाहनचालकाची चूक तात्काळ दिसून परवाना द्यायचा की नाही, याबाबत निर्णय घेता येणार आहे. आठवड्यापूर्वी या कॅमेऱ्यांतून निरीक्षण करून परवाना देण्याचे काम सुरू झाले असल्याचे वाहन निरीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.
पाटील म्हणाले, ४ के ३० हे दोन वायफाय असणारे ट्रायपॉड कॅमेरे टेस्टच्या वेळी लावले जातात. एक ते दोन किमी अंतरावरील छायाचित्र तसेच चित्रण यातून होते. वाहनचालक ट्रॅकवर कशी गाडी चालवितो, गेअर कसे टाकतो, वळण कसे घेतो याची माहिती तात्काळ मिळते. विशेष म्हणजे यात रेकॉर्डिंगची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे एखाद्या परवान्या संदर्भात काही शंका आल्यास पुन्हा तपासणी करून निर्णय घेता येऊ शकतो. (प्रतिनिधी)