जि़प़तील बोगस आदेश प्रकरणाचे धागेदोरे सापडले

By Admin | Updated: September 11, 2014 00:41 IST2014-09-11T00:38:30+5:302014-09-11T00:41:37+5:30

चौकशीत आता पदाधिकाऱ्यांच्या ‘स्वीय’ सहायकांचा सहभागही पुढे आला आहे़

The bogus order case was found in the zip | जि़प़तील बोगस आदेश प्रकरणाचे धागेदोरे सापडले

जि़प़तील बोगस आदेश प्रकरणाचे धागेदोरे सापडले

नांदेड : आंतरजिल्हा बदल्यांसह जिल्हांतर्गत बदल्यांचा वर्षभर बाजार मांडल्याप्रकरणी शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी तसेच शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना नोटीस बजावल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीत आता पदाधिकाऱ्यांच्या ‘स्वीय’ सहायकांचा सहभागही पुढे आला आहे़
जिल्हा परिषदेत बदल्यांचे बोगस आदेश काढल्याचे प्रकरण विठ्ठल जमजाळ या शिक्षकाच्या जिल्हांतर्गत बदलीतून उघडकीस आले़ मुखेड गटशिक्षणाधिकाऱ्यांनी संशय आल्याने जमजाळ या शिक्षकास रूजू करून घेण्यास नकार दिला़ चौकशीअंती हा आदेश बोगस असल्याची बाब उघडकीस आली़ चौकशीदरम्यान एकाच आऊटवर्ड क्रमांकाद्वारे बदल्यांचे तब्बल ७ आदेश नेल्यानंतर त्याच क्रमांकाच्या आधारे बोगस आदेश तयार केल्याची बाबही पुढे येत आहे़ यातील दोन संशयित बदलीचे प्रकरणे चौकशीत बाहेर आली आहेत़ संबंधितांनी या प्रकारामागे कोण आहे याची इत्यंभूत माहिती चौकशी अधिकाऱ्यांपुढे सादर केली आहे़ त्यातून या प्रकाराचे गांभीर्य वाढतच चालले आहे़ बहुचर्चित आऊटवर्ड क्रमांक १४७६ द्वारे ७ बदल्या करण्यात आल्या होत्या़ त्यात किनवट, हिमायतनगर, लोहा, मुखेड, बिलोली , भोकर आणि धर्माबाद येथील होत्या़ सदर आदेश हे शिक्षणाधिकारी मडावी यांच्या सहीनिशी होते़ त्या प्रकरणाच्या संचिकाही आहेत़ मात्र या सात संचिका वगळता अन्य संशयित बदल्यांसाठीही १४७६ हाच आऊटवर्ड क्रमांक दिला आहे़ शिक्षण विभागातील आऊटवर्ड रजिस्टरवर आदेश नेणाऱ्या एका पदाधिकाऱ्याच्या स्वीय सहायकाचे नाव नमूद करण्यात आले आहे़ उपरोक्त सात आदेशाची नक्कल करीत बनावट सही शिक्क्यांचा वापर करून बदलीच्या ठिकाणचे आदेश बजावण्यात आले आहे़ मात्र सेवेतील अधिकाऱ्यांना खरे व बोगस आदेश लगेच लक्षात आल्यानंतर या प्रकरणाचे बिंग बाहेर आले आहे़
संशयित आदेश असलेल्या विठ्ठल किशनराव जमजाळ हे मुखेड तालुक्यात रूजू होण्यासाठी गेले होते़ त्यांना रूजू करून घेतले नाही़ त्यांना हे आदेश मुखेड तालुक्यातील सावरगाव येथील एका सहशिक्षकाने दिल्याचे चौकशीत पुढे आले आहे़ याच प्रकरणाच्या चौकशीत संशयित आदेश असलेले जी़ए़ पांचाळ हे तर हदगाव तालुक्यातून देगलूर तालुक्यातील करडखेड येथे रूजूही झाले आहेत़ त्यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते़ त्यांनी तर आपल्याला जि़प़ परिसरात एका पदाधिकाऱ्याच्या स्वीय सहायकाकडून बदलीचे आदेश दिले होते, असे स्पष्टपणे नमूद केले आहे़
संचिका असलेल्या बदल्यांचे आदेश हे सुस्पष्ट व एका विशिष्ट नमुन्यात आहेत़ तर संशयित आदेश हे चार ओळीचे व केवळ एका संदर्भीय पत्राचा उल्लेख करीत दिले गेले आहेत़ चौकशीत अनेक संशयित पुढे येत आहेत़ त्यांच्यावर कारवाई होणार की शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांवर कुऱ्हाड कोसळणार, हा प्रश्न पुढे येत आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: The bogus order case was found in the zip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.