२३ शाळांत बोगस आहार
By Admin | Updated: October 27, 2015 00:26 IST2015-10-27T00:13:11+5:302015-10-27T00:26:17+5:30
लातूर : जिल्हा परिषदेच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत दुष्काळाच्या विषयाला बगल देत विविध विषयावर चर्चा झाली़

२३ शाळांत बोगस आहार
लातूर : जिल्हा परिषदेच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत दुष्काळाच्या विषयाला बगल देत विविध विषयावर चर्चा झाली़ परंतु पोषण आहारासाठी येणाऱ्या वस्तू खराब असल्याचे लातूर तालुक्यातील पेठ येथील जिल्हा परिषद शाळेत आढळून आल्याने या विषयावर सर्वसाधारण सभेत पोषण आहाराचा विषय गाजला असून, या पोषण आहाराची चौकशी करुन त्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्याचा निर्णय जिल्हा परिषद अध्यक्षांनी घेतला आहे़
जिल्हा परिषदेचे वार्षिक सर्वसाधारण सभा झाली़ या सर्वसाधारण सभेला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभा पाटील कव्हेकर, जि़प़ उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेशकुमार मेघमाळे यांच्यासह विविध विभागाच्या सभापतींची उपस्थिती होती़ यावेळी सवई यांनी पथदिव्याच्या कामांच्या चौकशीची मागणी केली़ दुष्काळी परिस्थिती असतानाही सभापतींना नवीन गाड्यांची मागणी करण्यात आली व या गाड्यांसाठी १० चालकांच्या पदनिर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचाही निर्णय घेण्यात आला़ तसेच नळेगाव ते उकाची वाडी येथील कामाची चौकशी, तिर्थक्षेत्राचा दर्जा याबाबत चर्चा करुन नळेगावच्या प्रश्नांवर स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला़ तसेच महिला व बालकल्याण विभागात विभागांतर्गत दिलेल्या बोगस प्रशिक्षणाची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला़ या बरोबरच लातूर तालुक्यातील पेठ येथील जिल्हा परिषद शाळेत निकृष्ठ दर्जाची तूर दाळ, मसुर दाळ, तांदुळ आढळून आला़ त्यामुळे जिल्ह्यातील ३ लाख ३० हजार विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ विद्यार्थ्यांच्या पोषण आहारावर वर्षाकाठी ३५ कोटींचा खर्च केला जातो आणि दुसरीकडे शासनामार्फत खाजगी एजन्सीला कंत्राट देऊन कसल्याही पोषण आहाराच्या वस्तू विद्यार्थ्यांच्या आहारात वापरल्या जात असल्याचे आढळून आले आहे़ त्यामुळे या विषयावर सर्वसाधारण सभेत मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला़ माजी जि़प़ अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे यांनी सूचक म्हणून पोषण आहाराबाबत भूमिका मांडली़ तर जि़ प़ सदस्य भरत गोरे व रामचंद्र तिरुके यांनी यातील दोषी कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली़ काही सदस्यांनी एजन्सीचे कंत्राट रद्द करण्याची मागणी केली़ दीड ते दोन तास झालेल्या गोंधळानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा पाटील, उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी करुन कायदेशीर पद्धतीने या बाबतचा अहवाल शासनाकडे पाठवू, असे आश्वासन दिले़ त्यानंतरच पोषण आहाराचा विषय थांबला़
जळकोट तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत निकृष्ट पोषण आहार, औसा तालुक्यातील गोंद्री येथील जिल्हा परिषद शाळेतील निकृष्ट आहाराच्या प्रकारानंतर लातूर तालुक्यातील पेठ येथील जिल्हा परिषद शाळेतही निकृष्ट पोषण आहारामध्ये निकृष्ट मसूर दाळ, तूर दाळ, तांदुळ आदी वस्तू आढळून आल्या आहेत़ त्यामुळे या पोषण आहाराची चौकशी करुन यातील दोषी कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी सभागृहात बहुमताने करण्यात आली़
४स्वच्छ व सुंदर जिल्हा परिषद असल्याचे स्वप्न दाखविणाऱ्या जिल्हा परिषदेतील स्वच्छतागृहामध्ये जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या दिवशीच पाणी नसल्याने गोंधळ उडाला़ सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद सदस्यांनी विषय उचलताच त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभाताई पाटील यांनी स्वच्छतेची कामे न करणाऱ्या कर्मचाऱ्यांची काम न केल्यास पगार बंद करा, असा आदेश संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्याने कर्मचाऱ्यात खळबळ उडाली आहे़