जिल्ह्यात लाचखोरी फोफावली

By Admin | Updated: March 31, 2016 00:29 IST2016-03-31T00:22:31+5:302016-03-31T00:29:02+5:30

उस्मानाबाद : लाचेची मागणी केल्या प्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह एका तलाठ्याविरूध्द बुधवारी उस्मानाबाद येथील आनंदनगर, मुरूम व

Bofors in the district | जिल्ह्यात लाचखोरी फोफावली

जिल्ह्यात लाचखोरी फोफावली


उस्मानाबाद : लाचेची मागणी केल्या प्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह एका तलाठ्याविरूध्द बुधवारी उस्मानाबाद येथील आनंदनगर, मुरूम व येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ एकाच दिवशी दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह एका तलाठ्याविरूध्द लाचप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याने लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराविरूध्द येरमाळा पोलीस ठाण्यांतर्गत वाळू चोरीची कारवाई करण्यात आली होती़ या प्रकरणात २१ जानेवारी रोजी तक्रारदारास पोलीस शिपाई नवनाथ शिवाजी शिंदे यांनी तक्रारदारास ‘गुन्हा दाखल न करता वरिष्ठांना सांगून ट्रकसह तक्रारदारास सोडण्याचे बक्षीस म्हणून व भविष्यात वाळूचोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी’ पाच हजार रूपयांची मागणी केली़ यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिली होती़ या तक्रारीची दखल घेवून उपाधीक्षक अश्विनी भोसले यांनी पोलीस अधीक्षक डॉ़ डी़एस़स्वामी, अपर पोलीस अधीक्षक गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला होता़ त्यावेळी पोलीस शिपाई नवनाथ शिंदे याने पंचांसमक्ष पाच हजार रूपये लाचेची मागणी केली़ या कारवाईचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला होता़ याप्रकरणात वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांनंतर येरमाळा पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोनि आघाव हे करीत आहेत़
उमरगा तालुक्यातील मुरूम येथील पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार जुम्माखाँन दस्तगिर पठाण यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह तक्रारदाराच्या चुलत भावाविरूध्द कारवाई करून दारूच्या मालासह मुद्देमाल पकडला होता़ या प्रकरणात मुरूम पोलीस ठाण्यात अवैध दारूविक्रीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ त्यानंतर तक्रारदार यांच्या चुलत भावाच्या पत्नीने तक्रारदार यांच्याकडे येवून त्यांना सोडून देण्याची विनंती केली़ तक्रारदार हे सायंकाळी मुरूम पोलीस ठाण्यात गेले़ त्यावेळी तक्रारदाराच्या भावाला दारूबंदीच्या केसमध्ये नोटीस देवून सोडल्याचे बक्षीस म्हणून व भविष्यात त्याच्याविरूध्द केस न करण्यासाठी तीन हजार रूपये लाचेची मागणी पोलीस हेडकॉन्स्टेबल जुम्माखान दस्तगिर पठाण यांनी केली़ तसेच तडजोडीअंती १५०० रूपयांची मागणी केल्याची तक्रार पठाण यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती़
या तक्रारीनंतर एसीबीच्या उपाधीक्षक अश्विनी भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी १७ मार्च रोजी मुरूम येथील पोलीस ठाण्यासमोरील पानटपरीसमोर सापळा रचला होता़ त्यावेळी जुम्माखाँन पठाण यांनी तक्रारदाराच्या कामासाठी तीन हजार रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती १५०० रूपयांची मागणी पंचासमक्ष केली़
या कारवाईचा अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात आला होता़ वरिष्ठांच्या सूचनेनंतर या प्रकरणात पोलीस हवालदार जुम्माखाँन पठाण यांच्याविरूध्द मुरूम पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या घटनेचा अधक तपास पोनि बी़जी़आघाव हे करीत आहेत़ (प्रतिनिधी)
येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने मार्च महिन्यात आजवर एक दोन नव्हे तब्बल सात ठिकाणी कारवाई केली आहे़ मागील दोन दिवसांपूर्वीच परंडा तालुक्यातील घारगाव सज्जाच्या तलाठी स्वाती ढोणे यांनी तक्रारदाराकडून खासगी लेखनिक सतिश पाटील यांच्यामार्फत २५०० रूपये लाचेची मागणी करून स्विकारल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे़ तर लाचेची मागणी केल्याप्रकरणात एका पोलीस हवालदारासह तलाठ्याविरूध्द बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ शिवाय पोलीस शिपायाला पाच हजाराची लाच घेताना रंगेहात जेरबंद करण्यात आले आहे़ एकूणच जिल्ह्यात फोफावलेल्या लाचखोरीचा ‘एसीबी’ने पर्दाफाश केला असून, एकाच दिवशी तीन गुन्हे दाखल झाल्याने लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत़
उस्मानाबाद तालुक्यातील बोरगाव राजे शिवारात तक्रारदाराची जमीन आहे़ तक्रारदाराला पैशाची आवश्यकता असल्याने त्यांनी उस्मानाबाद येथील एका बँकेतून दोनवेळेस कर्ज घेतले होते़ दोन्ही कर्जासाठी तक्रारदार यांनी तारण म्हणून शेतजमिनीवर बोजा चढविला होता़ दोन्ही कर्जाची पूर्णपणे परतफेड केल्यानंतर त्यांनी महाळंगी सज्जाचे तलाठी रामहरी दादाराव माने यांना आवश्यक ती कागदपत्रे देवून सातबाऱ्यावरून कर्जाच्या बोजाच्या नोंदी कमी करण्याबाबत वेळोवेळी सांगितले होते़ तक्रारदार यांनी १८ फेब्रुवारी रोजी माने यांची भेट घेतली असता सातबाऱ्यावरील कर्जाचा बोजा कमी करून तसा उतारा देण्यासाठी माने यांनी बक्षीस म्हणून ५०० रूपये लाचेची मागणी केली़ लाचेची मागणी होताच तक्रारदाराने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती़ या तक्रारीनंतर ९ मार्च रोजी एसीबीने उस्मानाबाद येथे तलाठी रामहरी माने यांच्याविरूध्द पंचासमक्ष सापळा रचला होता़ त्यावेळी माने यांनी तक्रारदाराच्या कामासाठी लाचेची मागणी केली होती़ या कारवाईचा अहवाल वरिष्ठांकडे देण्यात आला होता़ वरिष्ठांच्या सूचनेनंतर बुधवारी महाळंगी सज्जाचे तलाठी रामहरी दादाराव माने यांच्याविरूध्द आनंदनगर पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला.तपास पोनि आसिफ शेख हे करीत आहेत़

Web Title: Bofors in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.