‘बॉडीबिल्डर’ शहाबाज क्षणार्धात नि:शब्द
By Admin | Updated: May 18, 2017 23:16 IST2017-05-18T23:13:07+5:302017-05-18T23:16:26+5:30
बीड : सव्वापाच फूट उंची.. धिप्पाड शरीरयष्टी...एकाच वेळी पाच- सहा जणांशी भिडण्याची ताकद; पण धारदार शस्त्रापुढे बॉडीबिल्डर शहाबाज खान क्षणार्धात नि:शब्द झाला.

‘बॉडीबिल्डर’ शहाबाज क्षणार्धात नि:शब्द
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : सव्वापाच फूट उंची.. धिप्पाड शरीरयष्टी...एकाच वेळी पाच- सहा जणांशी भिडण्याची ताकद; पण धारदार शस्त्रापुढे बॉडीबिल्डर शहाबाज खान क्षणार्धात नि:शब्द झाला. संपूर्ण शहराला हादरुन सोडणाऱ्या या घटनेतील मुख्य आरोपी पदवीधर असून बुधवारी रात्रीच तो पोलिसांना शरण आला.
शहाबाज दलबीर खान (३२ रा. हाफिजगल्ली, जुना बाजार) हा बालेपीर भागात जीम चालवत असे. जुन्या वादातून त्याची कारंजा परिसरातील भरवस्तीत बुधवारी रात्री साडेआठ वाजता हत्या करण्यात आली. याप्रकरणी शहर ठाण्यात दस्तगीर खान हमीद खान यांच्या फिर्यादीवरुन राजू खान, समद खान, अरबाज उर्फ कालू राजू खान, अफरोज राजू खान, सुमेर समद खान, जुबेर समद खान (सर्व रा. कारंजा परिसर) या सहा जणांवर खुनाचा गुन्हा नोंद झाला. जुन्या भांडणातून ही हत्या झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
मयत शहाबाज खान हा बुधवारी रात्री कारंजा परिसरातील एक दुकानात अत्तर खरेदीसाठी आला होता. तोंडाला रुमाल बांधून आलेल्या मारेकऱ्यांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. शहाबाज याने मागे वळून पाहताच अरबाज उर्फ कालू खानने त्याच्या छातीवर धारदार शस्त्राने वार केला. हा वार इतका खोलवर गेला की, शहाबाज जागीच कोसळला. त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सोडून मारेकरी लगेचच पसार झाले. शहाबाज व मारेकऱ्यांचा जुना वाद होता. शहाबाज याने राजू खान याला सहा महिन्यांपूर्वी मारहाण केली होती. हे प्रकरण आपसात मिटवण्यात आले या मारहाणीचा राग मनात धरुन राजू खान याचा मुलगा अरबाज उर्फ कालू याने इतरांच्या मदतीने शहाबाज यांना संपविण्याचा कट रचला, अशी माहिती तपासात समोर आली आहे. मात्र, एवढ्या निर्घृणपणे हत्या झाल्याने घटनेमागे काही वेगळे कारण आहे का? याचे कांगेरे तपासणेही सुरु झाले आहे.
शहाबाजची हत्या झाल्याच्या बातमीवर अनेकांचा विश्वासही बसत नव्हता. गुरुवारी सकाळी हत्तीखाना भागातील दर्गाह शाह शमशोद्दीन येथील कब्रस्तानमध्ये त्याचा दफनविधी पोलीस बंदोबस्तात पार पडला. भरवस्तीत घडलेल्या घटनेने शहरातील कायदा- सुव्यवस्था ढासळली असून नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे.अरबाज उर्फ कालू खान याला गुरूवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.