सालगड्याचे शव विहिरीत

By Admin | Updated: April 27, 2016 00:30 IST2016-04-26T23:56:26+5:302016-04-27T00:30:06+5:30

वाळूज महानगर : तीसगाव शिवारातील शेतमालकाच्या विहिरीत मंगळवारी सकाळी एका ४२ वर्षीय सालगड्याचा मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

The body of the swirl is well in the well | सालगड्याचे शव विहिरीत

सालगड्याचे शव विहिरीत

वाळूज महानगर : तीसगाव शिवारातील शेतमालकाच्या विहिरीत मंगळवारी सकाळी एका ४२ वर्षीय सालगड्याचा मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. या विहिरीच्या काठावर विषारी कीटकनाशकाची बाटली आढळल्यामुळे संशय बळावला असून त्याने आत्महत्या केली की कोणी त्याचा खून करून विहिरीत प्रेत टाकले; याचा पोलीस तपास करीत आहेत.
तीसगाव शिवारातील गट नंबर ३० मध्ये पांडुरंग बोरुडे (रा. तीसगाव) यांची शेती असून त्यांच्याकडे कारभारी भानुदास कोल्हे (रा. कडेगाव, ता.बदनापूर, जि.जालना) हे दोन वर्षांपासून सालगडी म्हणून काम करीत होते. कारभारी यास दोन पत्नी असून ते तीसगाव शिवारातील बोरुडे यांच्या शेतवस्तीवर एकटेच राहत
होते.
सोमवारी सायंकाळी शेतमालकाचा मुलगा माधव हा कारभारीसाठी जेवणाचा डबा घेऊन शेतात गेला. मात्र, त्यास कारभारी दिसला नाही. त्याची मफलर विहिरीत पडलेली दिसली. त्यामुळे बोरुडे कुुटुंबियांनी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाऊन ही माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता त्यांना विहिरीत काही दिसले नाही.
आता अंधार पडला असून तुम्ही त्याचा मूळ गावाकडे शोध घ्या, असा सल्ला पोलिसांनी दिला होता. दरम्यान, पुन्हा मंगळवारी सकाळी या विहिरीत शोध घेण्यासाठी पोहेकॉ. एस.एम. रोकडे, पोकॉ. इंगळे, चालक गायकवाड, चार्ली पोलीस कर्मचारी घटनास्थळी गेले. पोलिसांनी वाळूज अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना मदतीसाठी बोलावून घेतले. विहिरीत काहीही दिसत नसल्यामुळे विद्युत पंप सुरू करून पाणी उपसले असता पाण्याच्या तळाशी एक मृतदेह पोलिसांना दिसून आला.
विहिरीजवळ कीटकनाशकाची बाटली
पोलीस पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली असता त्यांना विहिरीजवळच विषारी कीटकनाशकाची बाटली तसेच एक शर्ट व चपला दिसून आल्या. विहिरीच्या काठावर आढळलेला शर्ट व चपला सालगडी कारभारी कोल्हे यांचा असल्याचे शेतमालक पांडुरंग बोरुडे यांनी पोलिसांना सांगितले. त्यामुळे विहिरीतील मृतदेह हा कारभारी कोल्हे यांचाच असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला.
अनेक तर्कवितर्क
शेतवस्तीवर असलेल्या झोपडीवजा घरात कारभारी एकटेच राहत असल्याचे बोरुडे यांनी सांगितले. कारभारीला दोन बायका असून त्या दोन्ही येथे राहत नसल्याचे समजते. मृतदेह विहिरीच्या पाण्यात तरंगण्याऐवजी तळाला आढळल्यामुळे हा घातपात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. बोरुडे यांची एक म्हैस काही दिवसांपूर्वी चोरीला गेली होती. म्हैस चोरीला गेल्यामुळे कारभारी तणावाखाली होते. मालकाच्या भीतीमुळे त्यांनी आत्महत्या केली की त्यांना विष पाजून विहिरीत ढकलण्यात आले, याविषयी चर्चा सुरू आहे. एमआयडीसी वाळूज ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विहिरीचे पाणीही
झाले विषारी
वाळूज अग्निशामक दलाचे प्रमुख प्रवीण घोलप, अरविंद चौधरी, एस.एफ.वासनकर, ए.जे.गोसावी, एस.बी.राऊत, ए.बी.डकरे, पी.एन.साळुंके, आर.जी.चव्हाण आदींनी सुरुवातीला विहिरीत पाण्याची तपासणी केली असता पाण्याला उग्र वास येत असल्यामुळे तसेच विहिरीच्या काठावर कीटकनाशकाची बाटली सापडल्यामुळे पाणी विषारी झाल्याचा अंदाज वर्तविला. दरम्यानच्या कालावधीत विहिरीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे मृतदेह तळाला गेला होता. मृतदेह काढताना पाणी तोंडात गेल्यास विषबाधा होण्याची भीती अग्निशामक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्यानंतर अखेर गळ टाकून कर्मचाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढला. हा मृतदेह कारभारीचाच असल्याचे बोरुडे यांनी पोलिसांना सांगितले.

Web Title: The body of the swirl is well in the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.