त्या बेपत्ता तरुणाचा मृतदेह पोलिसांनी काढला उकरून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:27 IST2020-12-17T04:27:28+5:302020-12-17T04:27:28+5:30

कायगाव : १४ महिन्यांपासून बेपत्ता असणाऱ्या अंमळनेर येथील २९ वर्षीय तरुणाचा मृतदेह गंगापूर पोलिसांनी शनिवारी रात्री जेसीबीच्या साह्याने उकरून ...

The body of the missing youth was exhumed by the police | त्या बेपत्ता तरुणाचा मृतदेह पोलिसांनी काढला उकरून

त्या बेपत्ता तरुणाचा मृतदेह पोलिसांनी काढला उकरून

कायगाव : १४ महिन्यांपासून बेपत्ता असणाऱ्या अंमळनेर येथील २९ वर्षीय तरुणाचा मृतदेह गंगापूर पोलिसांनी शनिवारी रात्री जेसीबीच्या साह्याने उकरून काढला. अनैतिक संबंधातून या तरुणाचा खून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून, याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अंमळनेरचा तरुण गणेश दामोदर मिसाळ हा ५ ऑक्टोबर २०१९ पासून बेपत्ता होता. मिसाळ यांच्या कुटुंबीयांनी याबाबत १० ऑक्टोबर २०१९ रोजी गंगापूर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.

गेल्या वर्षभरापासून या प्रकरणाचा तपास सुरूच होता. दरम्यान, पोलिसांनी सचिन ज्ञानेश्वर पंडित आणि रवींद्र ऊर्फ पप्पू कारभारी बुट्टे (दोघेही रा. अंमळनेर, ता. गंगापूर) यांना ताब्यात घेतले. तपासात सचिन पंडित याचे गावातील एक महिलेसोबत अनैतिक संबंध होते. याची मयत गणेश याला माहिती असल्याने तो हे संबंध उघड करण्याची धमकी देत आरोपींना ब्लॅकमेल करत होता. याच कारणावरून आरोपींनी कट रचून त्याचे अपहरण करत त्यानंतर दोरीने त्याचा गळा आवळून खून केला. यासह पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचे प्रेत अंमळनेर शिवारातील पांडुरंग गाडे यांच्या शेतात पुरून टाकल्याचे पोलीस तपासात पुढे आले.

शनिवारी मयत गणेशचे प्रेत उकरून काढण्यासाठी पोलिसांनी नायब तहसीलदार एस. एन. शिंदे यांना पाचारण केले. जेसीबीच्या साह्याने पांडुरंग गाडे यांच्या शेतात आरोपींनी दाखवलेल्या जागेवर खोदल्यानंतर तीन फुटांवर पोलिसांना मयताचा सांगाडा मिळून आला. पोलीस नाईक संदीप डमाळे यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात सचिन ज्ञानेश्वर पंडित, रवींद्र ऊर्फ पप्पू कारभारी बुट्टे यांच्या विरोधात अपहरण आणि कट रचून खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे, सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद मुंढे, उपनिरीक्षक रामहरी चाटे, पोहेकॉ. कैलास निंभोरकर, विजय भिल्ल, पोलीस नाईक संदीप डमाळे, गणेश खंडागळे, सोमनाथ मुरकुटे, लक्ष्मण पुरी, मनोज बेडवाल, गणेश लिपणे, दत्तात्रय गुंजाळ आदींचा या कारवाईत समावेश होता.

--------- प्रेताच्या शोधासाठी उकरले दहा गुंठे शेत --------------

आरोपींनी गणेश मिसाळचा खून करत त्याचे प्रेम परिसरातील एका शेतात पुरले होते. पोलिसांनी आपला खाक्या दाखवल्यानंतर आरोपी गणेशचा खून करून त्याचे प्रेत कुठे पुरले हे सांगितले. प्रेताचा शोध घेण्यासाठी पोलिसांना सुमारे १० गुंठे शेत जेसीबीच्या माध्यमातून उकरावे लागले. शनिवारी रात्री ११ वाजता भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत नरवडे यांनी घटनास्थळीच मयताच्या सांगाड्याची उत्तरीय तपासणी केली. व्हिसेरासाठी काही भाग ताब्यात घेऊन उर्वरित मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. मयत गणेशच्या पश्चात वडील, भाऊ, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. दरम्यान, दोन्ही आरोपींना पोलिसांनी रविवारी न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. गंगापूर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावल्याने पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी तपास पथकाला १५ हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे.

--- कॅप्शन : अंमळनेर येथील तरुणाचा मृतदेह जेसीबीच्या साह्याने शोधताना पोलीस.

--- मयत गणेश मिसाळ

Web Title: The body of the missing youth was exhumed by the police